नागपूर,
temple-cleanliness-drive-vidarbhaस्वच्छता हा आपल्या संस्कृतीचा पाया असून, त्याला धार्मिक परंपरांचा आधार देण्यात आला आहे. तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षभर आयोजिण्यात आलेल्या विविध उपक्रमांपैकी महत्त्वाचा भाग म्हणजे मंदीर स्वच्छता अभियान! नव्या पिढीमध्ये आपले संस्कार रुजविण्यासाठी सामाजिक कार्यक्रमांचा मोठा प्रभाव पडतो. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील गावखेड्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हे अभियान राबविले. चंद्रपुरातील जिवती असो की, बुलढाण्याचे जळगाव जामोद किंवा गडचिरोलीतील अहेरी-आलापल्लीचा दुर्गम भाग...या सर्व ठिकाणी तरुण भारताच्या आवाहनाला नागरिकांनी उत्सफूर्त आणि सक्रीय प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्यांनी उत्साह वाढविला होता. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नंतर याच स्वच्छ-सुंदर मंदीरांच्या प्रांगणात तुळशी विवाहाच्या सामूहिक सोहळ्यांचे थाटामाटात आयोजन करण्यात आले.

या अभियानात मंदीर आणि बुद्धविहारांसह एकूण ८,३८२ धार्मिक प्रतिष्ठानांमध्ये स्वच्छता करण्यात आली. काही ठिकाणी उत्साही मंडळींनी मंदीराची रंगरंगोटीही करून घेतली. या संपूर्ण अभियानात दीड लाखांवर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेतला. या अभियानाची औपचारीक सुरुवात राजमाता जिजाऊंचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजातून झाली. या ठिकाणी झालेल्या भव्य सार्वजनिक कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी, मेहकरच्या श्री बालाजी मंदीरात तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी स्वच्छता करून, तुळशीचे रोप रुजविले. अंजनगाव सुर्जी आणि अचलपूरमध्येही उद्घाटनपर भव्य कार्यक्रम झाले. अभियानातील सर्वात मोठा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यातील लाखनीमध्ये झाला. तब्बल २,२०० विद्यार्थ्यांच्या ३ किलोमीटर लांब दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले. मंदीर, बुद्ध विहार, चर्च आणि गुरुद्वारा अशा १ हजारांवर धार्मिक स्थळी स्वच्छता करून, तुळशीचे रोप रुजविण्यात आले.
श्रद्धा, संस्कृती आणि शुद्ध पर्यावरणाचे प्रतीक असलेल्या तुळशीने तंत्रज्ञानाच्या या युगात, जिथे सर्वकाही ‘स्मार्ट’ आणि ‘इन्स्टंट’ असायला हवं, तिथेही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. तुळस आपल्या नातेसंबंधांमध्ये, श्रद्धांमध्ये आणि संस्कारांमध्ये खोलवर रुजलेली आहे. या श्रद्धेने अनेक पिढ्या निरोगी, समर्पित आणि संतुलित बनवल्या आहेत. तुळशीचे रोप लावाच कारण, ती फक्त एक वनस्पती नाही तर ती आपली परंपरा आहे. ती आपल्याला मातीशी, संस्कृतीशी आणि निसर्गाशी जोडणारा सेतू आहे.
चौकटीत...
घेतला वसा टाकू नका!
गेल्या वर्षी तरुण भारतच्या पुढाकारातून तुळशीच्या सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आणि एक नवीन सुरुवात झाली. गेल्या वर्षी हाती घेतलेला हा वसा यावर्षी टाकून देऊ नका. अधिक जाेमाने तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन आपापल्या स्तरावर आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या उपस्थितीत होईल, असे करा. सुदृढ आणि सश्रद्ध युवा पिढी घडविण्यासाठी संस्कृतीचा हा वसा त्यांच्या हाती देण्याची गरज आहे. तुळशी विवाहाचा मुहूर्त शनिवार २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. चला तर, तयारीला लागा कारण, आता लगीनघाई सुरू झाली.