ट्रकची ट्रकला धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
सेलू,
truck-collides-with-another-truck तालुक्यातील केळझर येथील वळण रस्त्यावर सुनीता नर्सिंग कॉलेजजवळ दोन ट्रकची धडक झाली. यात मागून येणाऱ्या ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्याने समोरील ट्रक दुभाजकावर चढून उलटला तर धडक देणारा ट्रक रस्त्याच्या खाली उतरून ठोंबरे यांच्या शेतात शिरला. ही घटना मंगळवार, १७ नोव्हेंबरला रात्री १०.२० वाजताच्या सुमारास घडली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
 
 
truck-collides-with-another-truck
 
मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ४९ बी. झेड. ५९८१ क्रमांकाचा ट्रक वायगाव येथून कापसाच्या गाठी घेऊन कळमेश्वरकडे जात होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एच. आर. ५८ ई. ८२६७ क्रमांकाच्या ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील ट्रकचा चालक सरताज अली, रा. यवतमाळ याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर चढत उलटला तर मागून धडक देणारा ट्रकचा चालक मनोजकुमार यादव, रा. यमुनानगर हरयाणा याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उतरून ठोंबरे यांच्या शेतात शिरला. त्यामुळे शेतातील पिकाचेही नुकसान झाले. अपघाताची माहिती गावात पसरताच केळझर येथील युवकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोन्ही वाहनचालकांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.