सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
मुंबई
Tu Ahes Na
लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून, ‘तू आहेस ना’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. हा बंध दोघांचेही आयुष्य त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन कसे बदलतो, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.



‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, टेलिव्हिजन तसेच रंगभूमीवर अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रिया यांना चित्रपटाची भावनिक कथा विशेष भावली. त्यामुळेच त्यांनी या प्रकल्पाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ बोडके यांचा लव फिल्म्ससोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘देवमाणूस’ या चित्रपटात काम केले होते.

‘तू आहेस ना’च्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर. गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) २६ नोव्हेंबर रोजी गाला प्रीमियर विभागात चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, इफ्फीच्या गाला प्रीमियर विभागात स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या कामाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरव करण्यात आला आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “आजच्या काळात ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा विषय आणि त्याचे महत्त्व मला अभिनेत्री म्हणून विशेष भावले. चित्रपटात या विषयाची केलेली मांडणी आणि मी साकारत असलेली व्यक्तिरेखा यामुळे या चित्रपटाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी हा चित्रपट इफ्फीमध्ये पाहावा, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

सिद्धार्थ बोडके यांनीही या चित्रपटातील भूमिकेबद्दल आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “‘तू आहेस ना’ या चित्रपटाने मला भावनांचे विविध पैलू असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान दिले. अभिनेता म्हणून अशा प्रकारची भूमिका साकारण्याची माझी नेहमीच इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव फिल्म्ससोबतचा हा माझा दुसरा प्रकल्प आहे. वेगळ्या कथेसाठी आणि स्वतःमधील अभिनयाचा नवा पैलू शोधण्याची संधी देणाऱ्या या टीमसोबत पुन्हा काम करण्यास मी उत्सुक होतो.”

दिग्दर्शक दिपक गावडे म्हणाले, “दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला. विशेषतः ‘तू आहेस ना’ ही कथा माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. या चित्रपटाचा प्रतिष्ठित इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. प्रेक्षकांनी ही कथा मोठ्या पडद्यावर अनुभवावी.”

लव फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दिपक गावडे यांनी सांभाळली आहे. ‘तू आहेस ना’ हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.