जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात

अधिकारी-कर्मचार्‍यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
बुलढाणा,
two-day-training-for-officers-and-employees देशाच्या जनगणना २०२७ च्या दुसर्‍या टप्प्याच्या कामकाजाला सुरुवात झाली असून या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे उपस्थित होते.
 
 
two-day-training-for-officers-and-employees
 
जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्यात घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करण्याचे काम करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे प्रभावी नियोजन करून प्रत्यक्ष जनगणनेच्या कामासाठी यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणात जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत तसेच सांख्यिकी अन्वेषक वर्ग-२ निहाल धरंधरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्यातील पूर्वतयारी, कामकाजाची पद्धत आणि जबाबदार्‍यांबाबत मार्गदर्शन केले.
 
 
जनगणनेचा दुसरा टप्पा व्यापक स्वरूपाचा असल्याने मोठ्या प्रमाणात प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित यंत्रणेतील अधिकारी या प्रशिक्षणास उपस्थित आहेत.जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन संकलित माहितीची पडताळणी करणार आहेत. जनगणनेच्या प्रत्यक्ष कामकाजादरम्यान उद्भवणार्‍या संभाव्य समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या प्रशिक्षणासाठी जनगणना कक्षाच्या संजीवनी मुंपडे, तहसीलदार (सामान्य प्रशासन), पी. के. करे, नायब तहसीलदार तसेच सहायक महसूल अधिकारी अपेक्षा जाधव यांनी सहकार्य केले.