उत्तराखंड,
uttarakhand-bus-accident-8-deadउत्तराखंडमध्ये मंगळवारी पहाटे भीषण बस अपघात झाला. ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, २६ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.
समोर आलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सेवा कंपनीची ही बस हरिद्वारहून जोशीमठच्या दिशेने जात होती. मंगळवारी पहाटे टिहरी गढवाल जिल्ह्यातील गूलर बाजारजवळ बसचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस रस्त्याच्या बाजूचा कठडा तोडून पुलाखालील खोल दरीत कोसळली. या बसमध्ये सुमारे ३४ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बस सुमारे १०० मीटर खाली कोसळल्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केलं
या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, २६ जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा कमी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, बचावकार्य सुरू असताना मृतांचा आकडा वाढला. सात प्रवाशांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. जखमींना रुग्णवाहिकांमधून ऋषिकेश येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. काही जखमींवर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.