आशा सेविका व गटप्रवर्तकांसाठी ‘आशा भवन’ उभारणार : भोयर

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
वर्धा,
Pankaj Bhoyar
ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय कामानिमित्त दुर्गम भागांतून येणार्या आशा सेविका व गटप्रवर्तकांना निवास आणि इतर कामकाजासाठी येणार्या अडचणी लक्षात घेता त्यांच्यासाठी ‘आशा भवन’ उभारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली गटप्रवर्तकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंग पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा समूह संघटक दिपाली चांडोळकर, तालुका समूह संघटकांसह जिल्ह्यातील गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

पालकमंत्री भोयर पुढे म्हणाले, गट प्रवर्तकांना योग्य प्रशिक्षण देऊन लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा मानस असून, यामुळे शासकीय कामकाज आणि अहवाल सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान होईल. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभाग आणि समग्र शिक्षण विभागातील सुमारे १० हजार कर्मचार्यांच्या समायोजनाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेऊन मार्गी लावला. त्यांच्या पुढाकारामुळे या कर्मचार्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला, असेही ते म्हणाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती सेवा तसेच ऑपरेशन थिएटरच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधांचाही टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, पारदर्शक आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना व नियोजन सातत्याने करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पराग सोमण म्हणाले, आशा सेविका हा आरोग्य विभागाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत होते. जिल्ह्यात यापूर्वी आयोजित करण्यात आलेली आरोग्य शिबिरे यशस्वी होण्यातही आशा सेविकांचा मोलाचा वाटा राहिला असल्याचे ते म्हणाले.