वाशीम,
washim-news नागरिकांनी सादर केलेल्या वैध व मूळ पुराव्यांच्या आधारेच जात प्रमाणपत्रांचे वितरण करावे. तसेच, जात पडताळणी प्रक्रियेत दक्षता पथकांनी सादर केलेल्या पुराव्यांची सखोल व काटेकोर तपासणी करावी, असे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. ज्योतीराम चव्हाण, प्रा. डॉ. गजानन खराटे आणि निलिमा सरप (लखाडे) यांनी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी वि÷श्वनाथ घुगे, कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळनाथचे उपविभागीय अधिकारी रवी काळे, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष नरेंद्र फुलझेले, उपायुक्त शरद चव्हाण, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक दीपा हेरोळे, संशोधन अधिकारी राहुल चोंडकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुनार बंजारा, मथुरा बंजारा, सोनार बंजारा, ढालिया बंजारा, शिंगाड्या बंजारा, मथुरे आणि लाडवाणी आदी जातीसमूहांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच, लाडवाणी जातीसमूहाच्या प्रतिनिधींची सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकार्यांनी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित राहील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पात्र अर्जदारांना नियमानुसार प्रमाणपत्र मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणा दक्षता घेतील, असे सांगितले.
संबंधित १४ जातींच्या समाजबांधवांना त्यांच्याकडील वैध व मूळ पुराव्यांच्या आधारे सुलभतेने जात प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. यासाठी जात प्रमाणपत्र वितरण व जात पडताळणी प्रक्रियेत शासनाच्या सन २००२ व २०१२ मधील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. दक्षता पथके आणि संबंधित यंत्रणांनी आयोगाच्या व शासनाच्या निर्देशांनुसार पुराव्यांची काटेकोर पडताळणी करून पात्र नागरिकांना न्याय द्यावा, अशा सूचनाही आयोगाच्या सदस्यांनी दिल्या.