वाशीम जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई मोहीम!

अंमली पदार्थ, अवैध शस्त्रांसह १४ संशयित आरोपींना अटक

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |

वाशीम,
washim-police-crackdown-14-arrestedवाशीम जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि फरार आरोपींवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबविली. १७ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी विविध ठिकाणी प्रभावी कारवाई करीत उल्लेखनीय यश मिळविले.
 
washim
 
पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या मोहिमेत ७ किलो २५० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, पाने, फुले व बिया असलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच अवैध शस्त्र बाळगणार्‍यांविरुद्ध आर्म्स अ‍ॅट अन्वये दोन कारवाया करण्यात आल्या. भारतीय हत्यार कायद्यानुसार संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय एनबीडब्ल्यू वॉरंटमधील आरोपींना अटक करण्यात आली. रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या व फरार गुन्हेगारांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. या विशेष मोहिमेदरम्यान एकूण १४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
 
जिल्ह्यात अवैध धंदे, अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आणि फरार आरोपींविरुद्ध अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार आहेत. गुन्हेगारीला आळा घालून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी वाशीम जिल्हा पोलिस दल कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ही मोहीम पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली १५ अधिकारी व ११० अंमलदारांच्या सहभागातून राबविण्यात आली.