अनिल कांबळे
नागपूर,
assaults-a-young-man युवतीला वारंवार मेसेज करणे एका डिलिव्हरी बॉयला तरुणाला चांगलेच महागात पडले. युवतीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने त्याला गार्डनमध्ये बोलावून बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला असून, त्याच्या खिशातील पाच हजार रुपये आणि मोबाइल हिसकावल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीसह तिच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित बोरकर (२६, रा. इंदोरा वरपाखड) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.

वेनिका (२०), लक्की कुमरे (२०) आणि अनूप (२२, तिघेही रा. लुंबिनी नगर) अशी आरोपींची नावे आहेत. रोहित आणि वेनिका एकमेकांच्या परिचयाचे असून, त्यांच्यात मैत्री होती. या ओळखीतून रोहित वेनिकाला मेसेज पाठवत होता. मात्र, याच गोष्टीवरून वाद निर्माण झाला. वेरूनिकाने याबाबत आपल्या दोन मित्रांना सांगितले होते. घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास रोहित लुंबिनी नगर येथील एनआयटी गार्डनजवळील एका टपरीवर चहा पीत होता. त्यावेळी वेनिका आपल्या दोन्ही मित्रांसह तेथे आली. ‘बोलायचे आहे’ असे सांगून तिने रोहितला गार्डनमध्ये नेले. तेथे मेसेज पाठवण्याच्या कारणावरून तिघांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर लक्कीने बेल्टने रोहितला बेदम मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गार्डनमध्ये उपस्थित नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मारहाणीच्या गोंधळात रोहितच्या खिशातील पाच हजार रुपये आणि मोबाइल खाली पडले. ते आरोपींनी हिसकावल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या रोहितने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी वेरूनिकासह लक्की आणि अनूप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.