मुल्ला,
300-farmers-in-salekasa-deprived-of-crop-loans पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकर्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश असतानाही सालेकसा तालुक्यातील अंदाजे ३०० लाभार्थी शेतकर्यांना अद्याप बँकेकडून पीक कर्ज मिळालेले नाही. या गंभीर प्रकाराची दखल घेत दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय पुराम यांनी सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत शेतकर्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, सालेकसा तालुक्यातील सुमारे ३०० शेतकर्यांना संबंधित बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी तहसील कार्यालय, सालेकसा येथे उपोषण सुरू केले होते. या प्रकरणात जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गोंदिया यांनी १८ सप्टेंबर २०२६, ३० सप्टेंबर २०२६ आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्रांद्वारे संबंधित बँकेशी वारंवार पत्रव्यवहार करून लाभार्थी शेतकर्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत कळविले होते.
मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्यापही या शेतकर्यांना पीक कर्ज मिळालेले नसल्याचे आ. पुराम यांनी निवेदनात नमूद केले आहे. दुसरीकडे शासनाचे निर्देश, जिल्हाधिकार्यांचे आदेश आणि जिल्हा उपनिबंधकांकडून वारंवार पाठपुरावा होऊनही शेतकर्यांना कर्ज मिळत नसल्याने लाभार्थी शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, तालुक्यातील लाभार्थी शेतकर्यांना अद्याप नवीन पीक कर्ज का उपलब्ध करून देण्यात आले नाही, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तसेच कर्ज वितरणात दिरंगाई करणार्या आणि शासनाच्या निर्देशांचे पालन न करणार्या दोषी अधिकार्यांवर कठोर कार्यवाही करून पात्र शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. पुराम यांनी सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे केली आहे.