शिवाई इलेट्रिक बसमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत मिळणार!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सकारात्मक भूमिका

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
रिसोड,
shivai-electric-buses महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘शिवाई’ वातानुकूलित इलेट्रिक बस सेवेमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही इतर एसटी बसप्रमाणे मोफत अथवा नियमानुसार प्रवास सवलत लागू करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.यावेळी पत्रकारांच्या या रास्त मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत सकारात्मक शेरा व निर्देश दिले.
 

Transport Minister Pratap Sarnaik 
 
एसटी महामंडळाच्या साध्या, निमआराम, शिवशाही तसेच इतर वातानुकूलित बस सेवांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शासनाच्या नियमानुसार प्रवास सवलत उपलब्ध आहे. मात्र, महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक ‘शिवाई’ इलेट्रिक बस सेवेमध्ये ही सवलत लागू नसल्यामुळे पत्रकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, ग्रामीण व शहरी भागातील जनसमस्या शासनापर्यंत मांडणे तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना समान प्रवास सवलत मिळणे आवश्यक असल्याची भूमिका लखनसिंह ठाकुर यांनी परिवहन मंत्र्यांसमोर मांडली. तसेच ‘शिवाई’ इलेट्रिक बसमध्ये ही सवलत लागू करण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व आगारांना स्पष्ट परिपत्रक जारी करावे, ई-तिकीट प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा कराव्यात आणि वाहक व तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
 
 
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकार्‍यांकडून प्रस्ताव मागविण्याबाबत पुढाकार घेतल्याने राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या प्रवास सवलतीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. लखनसिंह ठाकुर यांनी परिवहन मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले.