आझम खान यांची इंडिया आघाडीवर नाराजी!

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
रामपूर,
azam-khan समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर विविध राजकीय आणि वैयक्तिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे. कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. ‘कृपया मला वैयक्तिक प्रश्न विचारू नका,’ असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले. यावेळी त्यांनी देशातील घटनात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीवर टीका करत इंडिया आघाडीच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.

azam-khan
सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीबाबत बोलताना आझम खान यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, या घटनात्मक संस्थांनी आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे. संबंधित संस्थांच्या कारभारामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुकांमध्ये निष्पक्षता राखली जात नसल्याची भावना जगभरात निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीबाबत बोलताना आझम खान यांनी रामपूरमधील निवडणुकीच्या घटनांचा उल्लेख केला. रामपूरमध्ये मतदानाच्या वेळी पोलीस अधिकारी आणि पीएसीच्या माध्यमातून मतदारांवर दबाव आणण्यात आल्याचा, तसेच नागरिकांना मतदानापासून रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची इंडिया आघाडीने एकत्रितपणे गंभीर दखल घ्यायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. रामपूरमधील घटनांकडे गांभीर्याने पाहिले असते, तर कुंदरकी, संभल, हरियाणा आणि बंगालमधील परिस्थिती वेगळी असू शकली असती, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रामपूर विकास प्राधिकरणाविरोधातील (आरडीए) खटला मागे घेण्याचा विचार असल्याचे आझम खान यांनी सांगितले. मोहम्मद अली जौहर विद्यापीठाच्या इमारती पाडण्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. विद्यापीठाच्या इमारतींवर बुलडोझर चालवून त्या उद्ध्वस्त कराव्यात, अशी उपरोधिक भूमिका मांडत शिक्षणसंस्था उभारणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला कशा प्रकारे लक्ष्य केले जाते, हे जगाने पाहावे, असे ते म्हणाले.
आपल्या कुटुंबाला झालेल्या त्रासाचाही त्यांनी उल्लेख केला. स्वातंत्र्यापेक्षा मोठे काहीच नाही, याची जाणीव असूनही तुरुंगात राहण्यापेक्षा रिक्षा चालवणे पसंत केले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या मुलांना उदरनिर्वाहासाठी विड्या वळण्याचे काम करावे लागले असते, तरी चालले असते; मात्र त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला पाहण्याची वेळ आली नसती, असे ते म्हणाले. एमटेकचे शिक्षण घेतलेल्या मुलासोबत वडिलांना पाच वर्षे एकांतवासात राहावे लागल्याचा उल्लेख करत त्यांनी आपली व्यथा मांडली.
याशिवाय, भविष्यातील निवडणुका केवळ धर्म आणि जातीच्या आधारावर लढवल्या जाणार नाहीत, असे मतही आझम खान यांनी व्यक्त केले. धर्माचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या काही लोकांच्या कृतींमुळे प्रत्यक्षात त्याच धर्माचे नुकसान होत असल्याची जाणीव नागरिकांना होऊ लागली आहे, असेही त्यांनी म्हटले.