ढाका
Bangladesh Violence बांगलादेशातील राजकीय संघर्षाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले असून, देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पहाटे राजधानी ढाका येथे अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्याचवेळी चितगावमधील पांचलाईश परिसरात माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला अज्ञात हल्लेखोरांनी आग लावली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील बंदी घातलेल्या अवामी लीग पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर या घटना घडल्या.

गेल्या वर्षी विशेष न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाच्या वर्धापन दिनानिमित्त अवामी लीगने गुरुवारी देशव्यापी लॉकडाउनची हाक दिली होती. या आंदोलनादरम्यान देशातील ६४ पैकी २८ जिल्ह्यांमध्ये देशी बॉम्बस्फोट, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या हिंसाचारात किमान चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
ग्रामीण बँकेच्या शाखांनाही लक्ष्य
हिंसाचाराची व्याप्ती वाढत असताना सिल्हेत, राजशाही, बारीसाल आणि फरीदपूर येथील मुहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या शाखांवरही हल्ले करण्यात आले. दुसरीकडे, बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) आणि अवामी लीगच्या समर्थकांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार संघर्ष झाला.
पश्चिम भागातील नराईल येथे बीएनपीच्या मोर्चावर झालेल्या हल्ल्यात पक्षाचे दोन स्थानिक नेते ठार झाले. फरीदपूर आणि पिरोजपूर येथे घडलेल्या स्वतंत्र घटनांमध्ये एका स्थानिक नेत्यासह एका परिवहन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
या संघर्षादरम्यान बीएनपीची किमान दोन कार्यालये आणि पक्षाच्या एका नेत्याचे घर पेटवून देण्यात आले. दुसरीकडे, अवामी लीगची दोन कार्यालये आणि पक्षाच्या नेत्यांशी संबंधित पाच मालमत्तांनाही आग लावण्यात आली. त्यामुळे दोन्ही राजकीय गटांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ढाका पोलिसांनी शहरात २४ तासांची विशेष मोहीम राबवली. या कारवाईत एकूण ५६५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांचाही समावेश आहे.शहरातील प्रमुख उड्डाणपूल, प्रवेशमार्ग आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. संभाव्य अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, बीएनपीचे नेते तारीख रहमान यांनी अवामी लीगला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बांगलादेशातील राजकीय संघर्षाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुसरीकडे, ५ ऑगस्ट २०२४ पासून भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या संभाव्य पुनरागमनामुळे देशातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.एकीकडे अवामी लीगचे आंदोलन, दुसरीकडे विरोधी पक्षांचा वाढता विरोध आणि विविध भागांतील हिंसक घटना यामुळे बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा अस्थिर बनली आहे. आगामी काळात राजकीय घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.