बांगलादेशात हिंसाचार उफाळला, सरकारवर टाळेबंदीची नामुष्की

मोहम्मद युनूस यांचे वडिलोपार्जित घर, बँकांची जाळपोळ, ढाक्यात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट,

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

ढाका,
bangladesh-violenceमाजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगने पुकारलेल्या देशव्यापी बंददरम्यान गुरुवारी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. ढाक्यात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, आंदोलकांनी माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे वडिलोपार्जित घर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रामीण बँकांच्या शाखा आणि राजकीय नेत्यांच्या मालमत्तांची जाळपोळ केली. पोलिसांनी आतापर्यंत ५६५ जणांना अटक केली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनावर टाळेबंदी लागू करण्याची नामुष्की आली. शेख हसीना यांच्या परतण्याच्या घोषणेनंतर वाढलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर बांगलादेशात हिंसाचार उफाळला आहे.
 

bangladesh 
अवामी लीगच्या आंदोलनाच्या विरोधात कट्टरपंथी संघटनांनी निदर्शने केल्याने परिस्थिती अजूनच बिघडली आहे. अनेक ठिकाणी अवामी लीगचे कार्यकर्ते आणि कट्टरपंथी संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाल्याने राजधानी ढाकासह देशातील विविध भागांत तणावाची परिस्थिती बनली आहे.
 
 
भारताचा शेजारी देश पुन्हा एकदा अशांत झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या परतण्यापूर्वी बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे. हसीना यांचे सरकार पडल्यानंतर सत्तेवर आलेले मोहम्मद युनूस यांचे चित्तगोंग येथील घर आणि त्यांच्याशी संबंधित बँकांच्या शाखा जमावाने जाळून टाकल्या. हसीना यांचे मूळ गाव असलेल्या गोपालगंजमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असून, जमावाने अनेक वाहने आणि एक पोलिस ठाणे जाळले. बॉम्बस्फोट, हिंसाचार, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या संघर्षाच्या घटनांमुळे बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अवामी लीग आणि वस्त्रोद्योग कामगारांच्या आंदोलनामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.
 
संघर्षात ४ ठार, ५४ जखमी
आंदोलक आणि पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात ४ लोकांचा मृत्यू तर ५४ जण जखमी असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. देशाच्या अनेक भागांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि बॉम्बस्फोटांच्या घटनांमुळे अशांततेची परिस्थिती आहे. ढाक्यात दोन आवामी लीग नेत्यांच्या घरांवर हल्ले आणि जाळपोळ झाली. बीएनपीची दोन कार्यालये आणि एका नेत्याच्या घरालाही आग लावण्यात आली.
२८ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर
देशाच्या ६४ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी २८ जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. सुरक्षा दल आणि पोलिसांनी बळाचा वापर करूनही परिस्थिती हाताबाहेर गेल्याने प्रशासनाला या भागांत संचारबंदी लागू करावी लागली, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. हिंसक आंदोलनाच्य पृष्ठभूमीवर ढाक्यात सुरक्षा वाढवण्यात आली असून, प्रमुख ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अराजकता पसरवणाऱ्यांना कठोर शिक्षा : तारिक रहमान
देशातील परिस्थितीवर आपल्या संदेशात पंतप्रधान तारिक रहमान यांनी म्हटले की, अराजकता पसरवणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. अवामी लीग ही दहशतवादी संघटना आणि फॅसिस्ट शक्ती आहे. अशा शक्तींना देशात थारा नाही. बीएनपी नेत्यांना केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत काम करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करावे.
आवामी लीगच्या आठ मागण्या
अवामी लीगने सरकारकडे आठ मागण्या केल्या आहे, त्यात पक्षावरील बंदी उठवणे, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण बरखास्त करणे, कथित बनावट निकाल आणि खोटे खटले मागे घेणे, राजकीय कैद्यांची सुटका करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे आणि बंद असलेले औद्योगिक कारखाने पुन्हा सुरू करण्याचा समावेश आहे. गुरुवारी वाहतूक, दुकाने, उद्योग, कार्यालये, बँका, न्यायालये आणि शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.