अभिनेत्री छाया कदम यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
मुंबई
Chhaya Kadam
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री छाया कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त निर्मितीत साकारलेल्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी त्यांना रशियातील प्रतिष्ठित BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्पेशल अवॉर्ड ऑफ द फेस्टिव्हल’ हा पुरस्कार मिळाल्याने छाया कदम यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



‘स्नो फ्लॉवर’मधील नंदाच्या भूमिकेची दखल

‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटात छाया कदम यांनी नंदा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या अभिनयाची आणि व्यक्तिरेखेच्या प्रभावी मांडणीची महोत्सवात विशेष दखल घेण्यात आली. विविध संस्कृतींमधील समान धागे प्रभावीपणे जोडणे आणि एका जिवंत राष्ट्रीय व्यक्तिरेखेची निर्मिती करणे या वैशिष्ट्यांसाठी चित्रपटाचा गौरव करण्यात आला.

२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात मिळालेला सन्मान छाया कदम यांच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.‘स्नो फ्लॉवर’ हा भारत आणि रशिया यांची सहनिर्मिती असलेला मराठी चित्रपट आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील लाल मातीचे निसर्गरम्य जग आणि सायबेरियातील बर्फाच्छादित प्रदेश अशा दोन भिन्न भौगोलिक आणि सांस्कृतिक विश्वांची सांगड घालण्यात आली आहे.

चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत अभिनेता वैभव मांगले यांनी दिग्या ही भूमिका साकारली आहे. याशिवाय सफू आलम आणि मनवा देवेंद्र भागवत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. वेगवेगळ्या संस्कृती आणि जीवनशैलींचे दर्शन घडवणारा हा चित्रपट कथानकाच्या वैशिष्ट्यामुळेही लक्ष वेधून घेत आहे.या पुरस्काराची बातमी छाया कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आनंद व्यक्त करत ‘स्नो फ्लॉवर’शी असलेले भावनिक नातेही उलगडले.‘एक जबरदस्त आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे! माझ्या ‘स्नो फ्लॉवर’ या भारत-रशिया सहनिर्मित चित्रपटासाठी BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मला ‘स्पेशल अवॉर्ड ऑफ द फेस्टिव्हल’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ‘स्नो फ्लॉवर’ या सिनेमाची गोष्ट कोकणातल्या लाल मातीत सुरू होऊन सायबेरियाच्या बर्फात एकरूप होते. हा सिनेमा आणि यातील माझी भूमिका माझ्यासाठी स्पेशल होती आणि कायमच राहील,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.