मुंबई
FDA अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबरोबरच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या मुंबईतील नामांकित खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईतील नऊ रेस्तराँ आणि खाद्यविक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये नॅचरल्स आईस्क्रीम, बेरूट, मियाँ कबाब्स, कॅफे आयडियल आणि ऐतिहासिक चेतना रेस्तराँ यांसारख्या प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि आवश्यक सुरक्षा नोंदींचा अभाव अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या. कारवाईनंतर संबंधित नऊ आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.
FDAच्या पथकाने मंगळवारी दक्षिण मुंबईतील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी केली. या वेळी अन्नसुरक्षेच्या नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन होत असल्याचे आढळले. विशेषतः मांसाहारी पदार्थांची हाताळणी, स्वच्छतेची व्यवस्था, कर्मचाऱ्यांचे संरक्षणात्मक साहित्य आणि अन्नसुरक्षेशी संबंधित कागदपत्रांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या.
मांसाहारी पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणा
मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या काही रेस्तराँमध्ये कच्चे आणि शिजवलेले मांस एकाच ठिकाणी योग्य झाकणांशिवाय ठेवण्यात येत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. भांडी धुण्याच्या विभागात गरम पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारी एप्रन, हातमोजे आणि केस झाकण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅपचा वापर करत नसल्याचेही निदर्शनास आले.
काही आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. अन्नसुरक्षा प्रशिक्षणाशी संबंधित FoSTaC प्रमाणपत्रांच्या नोंदी, बाह्य संस्थेकडून करण्यात आलेल्या तपासणीचे अहवाल तसेच अन्नसुरक्षा व्यवस्थापनाची आवश्यक कागदपत्रेही सादर करता आली नाहीत. या त्रुटींची गंभीर दखल घेत प्रशासनाने परवाने निलंबित करण्याची कारवाई केली.
८० वर्षांच्या चेतना रेस्तराँमध्येही अस्वच्छता
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील काळा घोडा येथे असलेल्या सुमारे ८० वर्षांच्या चेतना रेस्तराँमध्येही स्वच्छतेबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे कंटेनर योग्य दर्जाचे नव्हते. हे कंटेनर गंजलेल्या रॅकवर ठेवण्यात आले होते. रेफ्रिजरेटरच्या दरवाजाचे रबर खराब झाले होते, तर अनेक खाद्यपदार्थांवर आवश्यक लेबल लावण्यात आले नव्हते.
याशिवाय कीटकनियंत्रणासंबंधी नोंदी उपलब्ध नव्हत्या. स्वयंपाकघरातील जमिनीवर सांडपाणी साचलेले होते. खिडक्यांना संरक्षक जाळ्या नव्हत्या, फरशा फुटलेल्या होत्या आणि काही ठिकाणी बुरशी आढळून आली. या सर्व बाबी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे तपासणीत समोर आले.
मियाँ कबाब्समध्ये झुरळे, माशांचा वावर
फोर्ट परिसरातील मियाँ कबाब्समध्ये तपासणीदरम्यान झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव आढळला. कच्चे चिकन योग्य तापमानात साठवण्याऐवजी उघड्यावर ठेवण्यात आले होते. अन्नपदार्थ ठेवण्यासाठीचे कंटेनर थेट जमिनीवर ठेवलेले होते.
मांस बारीक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राचे अस्वच्छ भाग स्वच्छ ताटांच्या शेजारी ठेवण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर कीटकनियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची कोणतीही नोंदही संबंधित रेस्तराँकडे उपलब्ध नव्हती.
बेरूटमध्ये उंदीर आणि माशांचा प्रादुर्भाव
कफ परेड येथील बेरूट रेस्तराँमध्येही स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. या ठिकाणी उंदीर आणि माशांचा वावर होता. रेफ्रिजरेटरमधील चिलरला गंज लागला होता, तर फ्रिजमध्ये बर्फासोबत अन्नपदार्थांचे अवशेषही साठलेले होते.
अन्न शिजवण्याच्या विभागालगत असलेली स्वच्छतागृहेही अस्वच्छ अवस्थेत होती. याशिवाय, आवश्यक परवानगीशिवाय मिठाई तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असावा, असा संशय तपासणीदरम्यान व्यक्त करण्यात आला. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक तापमानाच्या नोंदी तसेच RuCo प्रमाणपत्रही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.मुंबईतील प्रसिद्ध खाद्य आस्थापनांमध्येच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी प्रशासनाने तपासणी अधिक गांभीर्याने घेतली आहे. नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याच्या निर्णयामुळे खाद्यव्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाची कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.