चार अस्वलांचा वनरक्षकावर हल्ला

अर्जुनी मोरगावच्या बुटाई जंगलातील घटना

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नवेगावबांध,
four-bears-attack-a-forest-guard जंगलात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांची तपासणी करत असताना चार अस्वलांनी वनरक्षकावर अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बुटाई क्रमांक २ परिसरातील कक्ष क्रमांक ३१८ मध्ये घडली. बुधवारी सकाळी अंदाजे ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वनरक्षक सतीश शेदरे गंभीर जखमी झाले. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
four-bears-attack-a-forest-guard
 
मिळालेल्या माहितीनुसार, वनरक्षक सतीश शेदरे हे नेहमीप्रमाणे जंगलात गस्तीवर गेले होते. दरम्यान, कक्ष क्रमांक ३१८ मध्ये वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांची तपासणी करीत असताना अचानक चार अस्वल त्यांच्या समोर आल्या. काही समजण्यापूर्वीच अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. या अस्वलांच्या कळपात एक नर, एक मादी आणि दोन बछड्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. अस्वलांच्या या अचानक झालेल्या हल्ल्यात शेदरे यांच्या हाताला आणि मांडीला दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या जंगलक्षेत्रात काम करणार्‍या वनकर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, पुरेशी सुरक्षा साधने आणि प्रतिबंधात्मक खबरदारी याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.