फुटाळा चौपाटी अतिक्रमणाच्या विळख्यात

प्रशासनाचे दुर्लक्ष की राजकीय अभय?

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

नागपूर,
futala-encroachmentनागपूर शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा चौपाटीवर आता अतिक्रमण माफियांचे साम्राज्य निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी केला आहे. एकीकडे नागपूर महानगरपालिका शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाया करून सामान्य दुकानदारांची दुकाने हटवित असताना दुसरीकडे फुटाळा चौपाटीवर मात्र अवैध दुकानांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या फुटाळा पोलीस चौकीच्या अगदी बाजूलाच सहा ते सात दुकाने उभारण्यात आल्याने पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

futala controvercy 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच फुटाळा परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आणि नवीन अतिक्रमण होऊ न देण्याचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या निर्देशांनंतरही फुटाळा परिसरात सहा ते सात नवीन दुकाने उभी राहिलीच कशी? संबंधित विभागांचे अधिकारी नेमके काय करीत आहेत? अतिक्रमण सुरू असताना प्रशासनाला त्याची माहिती नव्हती की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? असे अनेक प्रश्न ज्वाला धोटे यांनी उपस्थित केले आहेत.
सामान्य दुकानदारांवर कारवाई, फुटाळ्यावरील अतिक्रमणाला अभय?
नागपूर महानगरपालिका शहरातील महाल, गोधनी, पारडी, झिंगाबाई टाकळी यांसह विविध भागांमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबविते. अनेक ठिकाणी दुकानदारांना कोणतीही सवलत न देता रातोरात दुकाने हटविण्याची कारवाई केली जाते. अतिक्रमणाच्या नावाखाली सामान्य व्यावसायिकांवर कठोर कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाला फुटाळा चौपाटीवरील एवढे मोठे अतिक्रमण का दिसत नाही? पोलीस चौकीच्या अगदी बाजूला दुकाने उभी राहत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही? असा सवाल धोटे यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे या अतिक्रमण प्रकरणात स्थानिक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांचाही सहभाग असल्याचा तसेच एका सभापतींच्या पीएचेही दुकान या ठिकाणी असल्याचा गंभीर आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची केवळ अतिक्रमण हटविण्यापुरती मर्यादित चौकशी न करता या दुकानांना नेमके कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जागा कृषी विद्यापीठाची, दुकाने उभारली कुणाच्या परवानगीने?
फुटाळा चौपाटीवरील संबंधित जागा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची असून ही जागा महामेट्रोकडे देण्यात आल्याची माहिती ज्वाला धोटे यांनी दिली. त्यामुळे या जागेवर व्यावसायिक दुकाने उभारण्याची परवानगी नेमकी कोणी दिली? संबंधित जागेचा वापर कोणत्या अटींवर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे? परवानगी नसताना दुकाने उभारली असतील तर बांधकाम सुरू असतानाच कारवाई का करण्यात आली नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

आयुक्तांना निवेदन, तरीही कारवाईची प्रतीक्षा!
या प्रकरणी महिलांच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच आयुक्त मेश्राम यांनाही निवेदने देण्यात आल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले. संबंधित प्रशासनाला या अतिक्रमणाची माहिती देऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसेल, तर निवेदनांचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी केला. केवळ कागदोपत्री आश्वासने न देता प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
अतिक्रमण हटवा, अन्यथा चक्काजाम आंदोलन!
फुटाळा चौपाटीवरील सहा ते सात अवैध दुकाने तातडीने हटवावीत, या अतिक्रमणाला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी आणि राजकीय पदांचा प्रभाव वापरून दुकाने उभारली असतील तर संबंधितांवरही कारवाई करावी, अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांच्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालविणारे प्रशासन फुटाळा चौपाटीवरील कथित अतिक्रमणाबाबत शांत का आहे? पोलीस चौकीच्या शेजारीच दुकाने उभी राहत असताना प्रशासनाची नजर कशी चुकली? या दुकानांना राजकीय अभय आहे का? या प्रश्नांची उत्तरे नागपूरकरांना अपेक्षित आहेत. आता महापालिका आणि संबंधित प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते आणि अतिक्रमण हटविण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई कधी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.