फुटाळा परिसरात झाले मोकळे आकाश! मनपाची तातडीने कारवाई सुरू

ज्वाला धोटे यांच्या आक्रमक भूमिकेचा दणका

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नागपूर,
futala-lake-encroachmentफुटाळा तलाव परिसरातील अवैध अतिक्रमणाचा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी आक्रमकपणे लावून धरल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. फुटाळा चौपाटी परिसरातील अनधिकृत दुकाने आणि पीडीकेव्हीच्या जागेवरील कथित अतिक्रमणाविरोधात मनपा व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे.
 

futala conto 
फुटाळा परिसरातील म्युझिकल फाउंटनच्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेवर चौपाटीचे संचालन आणि दुकानांची उभारणी करण्यात आल्याचा मुद्दा ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला होता. तसेच पोलीस चौकीच्या अगदी बाजूलाच सहा ते सात अनधिकृत दुकाने थाटण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या अतिक्रमणांना राजकीय पाठबळ आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
एकीकडे मनपा प्रशासन रस्त्यावरील छोटे दुकानदार आणि हॉकर्सवर अतिक्रमणाच्या नावाखाली तातडीने कारवाई करते, तर दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळावरील मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता.
ज्वाला धोटे यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडताच प्रशासनाने अवघ्या २४ तासांत हालचाली सुरू केल्या. गुरुवारी मनपा आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने फुटाळा परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली. त्यामुळे परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि दुकानधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मात्र, ही कारवाई सर्व अतिक्रमणांवर निष्पक्षपणे होणार की केवळ काही निवडक दुकानांपुरतीच मर्यादित राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच पीडीकेव्हीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.