गोव्यात आता २४ तास खरेदी आणि मद्यविक्रीची मुभा; सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
गोवा
liquor sales
गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शॉपिंग मॉल आणि मद्यविक्रीच्या काही दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता गोव्यात मध्यरात्रीही खरेदी करता येणार असून, ठरावीक ठिकाणी मद्यविक्रीही चोवीस तास सुरू राहणार आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नव्या नियमाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.



गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक राज्याला भेट देतात. पर्यटनाचा हंगाम नसतानाही गोव्यात पर्यटकांची वर्दळ कायम असते. यामध्ये देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी सरकारने शॉपिंग मॉलना चोवीस तास दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता दिवसाच्या कोणत्याही वेळी खरेदी करता येणार आहे.

मॉलप्रमाणेच मद्यविक्रीच्या दुकानांबाबतही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील सर्वच मद्यविक्रीची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. विमानतळ परिसरातील मद्यविक्रीची दुकाने, मद्यविक्रीचा अधिकृत परवाना असलेली मोठी हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवरील मद्यविक्रीच्या दुकानांना चोवीस तास व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.

दुसरीकडे, सामान्य मद्यविक्री दुकानदारांना मात्र हा नियम लागू होणार नाही. त्यांना पूर्वीच्या निर्धारित वेळेनुसारच दुकाने सुरू ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे गोव्यातील मद्यविक्रीला चोवीस तासांची मुभा मिळाली असली, तरी ती विशिष्ट ठिकाणे आणि परवानाधारक आस्थापनांपुरतीच मर्यादित आहे.