नवी दिल्ली
India Increases Saudi Oil जागतिक ऊर्जा बाजारपेठेत भारताचे महत्त्व वाढत असताना भारतीय तेल बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारतासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आणि पुरवठ्यातील चढ-उतार महत्त्वाचे ठरतात. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. त्यामुळे भारतासारखी मोठी बाजारपेठ मिळवण्यासाठी तेल उत्पादक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. ऑक्टोबर महिन्यातील आयातीच्या आकडेवारीनुसार, भारताने संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) तुलनेत सौदी अरेबियाकडून अधिक कच्चे तेल खरेदी केले. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच असे चित्र पाहायला मिळाले आहे. भारतीय बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठी सौदी अरेबियाने सवलतीच्या दरात तेल पुरवण्याची रणनीती आखल्याचे समोर आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत रशिया पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा क्रमांक लागतो. सौदी अरेबियाकडून भारताने केलेली आयात वाढून प्रतिदिन सुमारे ७ लाख ९० हजार बॅरलवर पोहोचली आहे. गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. याउलट, यूएईकडून होणारी आयात घटून प्रतिदिन ६ लाख १२ हजार बॅरल झाली आहे. गेल्या सात महिन्यांतील हा सर्वांत नीचांक मानला जात आहे. या बदलामुळे भारताच्या तेल आयात बाजारपेठेत सौदी अरेबियाचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते.
भारताला अधिक तेल पुरवठा करण्यासाठी सौदी अरेबियाने उत्पादनात वाढ केली आहे. तसेच लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील यानबू बंदरातून तेल निर्यात वाढविण्यावर भर दिला आहे. याशिवाय भारतीय खरेदीदारांना सवलतीच्या दरात तेल उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही सौदीने दिला आहे. भारतासारख्या मोठ्या ग्राहक बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवणे हा या धोरणामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन ५८ लाख ८० हजार बॅरलवर पोहोचली. सप्टेंबरच्या तुलनेत आयातीत ४.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. याच काळात रशियाकडून होणारी तेल आयात ३.५ टक्क्यांनी वाढून प्रतिदिन १८ लाख ५० हजार बॅरल झाली. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या खरेदीतील जवळपास एकतृतीयांश हिस्सा रशियाचा आहे. त्यामुळे सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये स्पर्धा सुरू असतानाही भारताच्या तेल आयातीत रशियाचे वर्चस्व कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इराण युद्धाला सुरुवात झाल्यानंतर जागतिक तेल पुरवठ्याच्या समीकरणांमध्ये मोठे बदल झाले. इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला होर्मुझचा सामुद्रधुनी मार्ग बंद केल्याने आंतरराष्ट्रीय तेल वाहतुकीवर परिणाम झाला. या परिस्थितीत भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली. जागतिक पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता भारताने पर्यायी पुरवठादारांकडून तेल मिळवण्यावरही भर दिला.
एप्रिलनंतर संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात होणाऱ्या तेल आयातीत सुधारणा झाली होती. यूएईने ओपेकमधून बाहेर पडल्यानंतर भारताकडून त्यांची तेल खरेदी वाढवण्यात आली. मात्र, ऑक्टोबरमधील आकडेवारीत सौदी अरेबियाने यूएईला मागे टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे आखाती देशांमधील तेल बाजारपेठेतील स्पर्धेला नवे वळण मिळाले आहे.
कच्चे तेल हे केवळ इंधनाचे साधन नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा असलेल्या देशाला तेलाच्या किमतीतील वाढ किंवा पुरवठ्यातील अडथळ्यांचा थेट परिणाम सहन करावा लागू शकतो. पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींपासून ते वाहतूक खर्च आणि औद्योगिक उत्पादनापर्यंत अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे रशिया, सौदी अरेबिया आणि यूएई यांसारख्या प्रमुख पुरवठादार देशांमधील स्पर्धेचा भारताला कितपत फायदा होतो, याकडे ऊर्जा क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सवलतीच्या दरात तेल मिळवणे आणि पुरवठ्याचे विविध स्रोत कायम ठेवणे, ही भारतासाठी आगामी काळातील महत्त्वाची रणनीती ठरणार आहे.