शेजारी देशांशी संघर्ष न थांबवल्यास विनाश अटळ

अफगाणिस्तावरील हल्ल्यावरून भारताचा पाकिस्तानला इशारा

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

संयुक्त राष्ट्र,
india-slams-pakistan-unशेजारी देशांविरुद्ध संघर्ष भडकवून पाकिस्तान स्वतःचाच विनाश करत आहे. त्यांनी संघर्ष सुरूच ठेवल्यास विनाशापासून कोणीही रोखू शकणार नाही. लष्कराचा अवाजवी हस्तक्षेप देशाचा नाश करत आहे. अफगाणिस्तानातील निष्पाप लोकांवर हल्ले चढवून मानवाधिकार आणि आंतरारष्ट्रीय नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला सुनावले.
 

palistan 
भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ‘नैसर्गिक संसाधने आणि संघर्ष’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात पाकिस्तानच्या भूमिकेवर परखड शब्दांत टीका करताना म्हटले की, पाकिस्तानने यापूर्वी सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित केला, ते पाहता मला हे सांगणे महत्त्वाचे वाटते की, सिंधू पाणी करारावर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही विविध व्यासपीठांवर यावर आमची मते आधीच व्यक्त केली आहेत.
तिथे लोकशाही सरकार असते, तर हे घडले नसते. जनता आनंदी राहिली असती आणि त्यांच्याच एका प्रांतात अन्यायकारकपणे आणिबाणी लादली गेली नसती.
नैसर्गिक संसाधनांवर लष्कराचा ताबा
पाकिस्तानी लष्कराने देशातील नैसर्गिक आणि खनिज संसाधनांवर ताबा मिळवला आहे. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात आहे. खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तानातून खनिजांचे उत्खनन करून लष्कर परस्पर करार करत आहे. देशाच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर जनतेच्या हितासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे. मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खनिजांनी भरलेली एक लाकडी पेटी दाखवल्याच्या फोटोचा संदर्भ यावेळी हरीश यांनी दिला.
स्वार्थासाठी राष्ट्रपती राजवट लागू
खनिजांनी समृद्ध असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रदेशातील प्रांतीय सरकार हटवून तिथे लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीचा उद्देश स्वत:चा स्वार्थ साध्य करणे हाच आहे. खनिजांचे उत्खनन करून दहशतवादी गटांना निधी उपलब्ध करून देणे पाकिस्तानी लष्कराची रणनीती आहे. त्यांनी शेजारी राष्ट्रांना त्रास देणे थांबवावे अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा हरीश यांनी पाकिस्तानला दिला.