सणासुदीच्या हंगामात महाराष्ट्रातील पर्यटकांना केरळची भुरळ

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नागपूर
Kerala Tourism Campaign
निसर्गसौंदर्य, हिरवेगार डोंगर, मनमोहक समुद्रकिनारे, शांत बॅकवॉटर आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या केरळने सणासुदीच्या पर्यटन हंगामात महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळ टुरिझमकडून महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पर्यटन भागीदारांच्या बैठका आणि रोड शो आयोजित केले जात आहेत. आकर्षक हॉलिडे पॅकेजेस आणि विविध पर्यटन अनुभवांच्या माध्यमातून केरळला पर्यटकांचे आवडते ठिकाण बनवण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.



या मोहिमेअंतर्गत नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस टू बिझनेस (बीटूबी) बैठकीला केरळमधील जवळपास ४५ पर्यटन भागीदार उपस्थित होते. त्यांनी नागपुरातील स्थानिक ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर आणि पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधत केरळमधील पर्यटनाच्या विविध संधी, आकर्षक ऑफर्स आणि विशेष हॉलिडे पॅकेजेसची माहिती दिली. महाराष्ट्रातील पर्यटकांपर्यंत केरळची नवीन पर्यटन उत्पादने पोहोचविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

केरळच्या पर्यटन पॅकेजेसचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या सहा रात्रींच्या एका प्रवासात पर्यटकांना विविध प्रकारच्या पर्यटन अनुभवांचा आनंद घेता येणार आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, शांत बॅकवॉटरमधील हाउसबोट प्रवास, हिरवीगार हिल स्टेशन्स, चहाचे मळे, घनदाट जंगले आणि वन्यजीव पर्यटन अशा अनेक आकर्षणांचा या पॅकेजमध्ये समावेश आहे. त्यामुळे कुटुंबासह सुट्टी घालवणारे पर्यटक, हनिमूनसाठी जाणारे जोडपे तसेच निसर्गप्रेमींसाठी केरळ एक उत्तम पर्याय ठरत आहे.

देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत १०.९८ टक्के वाढ

केरळच्या पर्यटन क्षेत्रासाठी सकारात्मक चित्र समोर आले असून, पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार २०२५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात १०.९८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. वर्षभर पर्यटनाला चालना देणे, अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करणे आणि केरळला अनुभवाधारित पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करणे, हे विभागाचे उद्दिष्ट आहे.

पर्यटन मंत्री पी. सी. विष्णुनाध यांनी सांगितले की, केरळला केवळ पारंपरिक पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर विविध अनुभव देणारे प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. संस्कृती, वारसा, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे, वन्यजीव, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि निसर्ग पर्यटन अशा विविध अनुभवांची पर्वणी पर्यटकांना केरळमध्ये मिळणार आहे. राज्य सरकार पर्यटन क्षेत्राला लवकरच उद्योगाचा दर्जा देण्याच्या निर्णयाच्या दिशेनेही काम करीत आहे. यामुळे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होतील.

वायनाडच्या पर्यटन विकासावर विशेष भर

केरळ टुरिझमने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी वायनाड जिल्ह्यातील वैथिरी येथे 'बॅक वायनाड' उपक्रमाचा शुभारंभ केला. वायनाडचे नैसर्गिक सौंदर्य, कृषी संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि स्थानिक परंपरा देश-विदेशातील पर्यटकांसमोर आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच जबाबदार पर्यटन अभियानांतर्गत नवीन लाइफ एक्स्पिरियन्स ट्रेल्स, तिरुनेल्ली सर्किट, चेकाडी फार्म भेट आणि कॉफी अनुभव अशा उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाडला सुरक्षित आणि शाश्वत जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी होमस्टे सुविधांचे नूतनीकरण, जबाबदार पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. वायनाडमधील कॉफी, मसाले, पारंपरिक तांदळाचे प्रकार, मध, स्थानिक खाद्यपदार्थ, कृषी जीवन आणि आदिवासी संस्कृती यांना पर्यटनाशी जोडण्यात येणार आहे. आदिवासी वारसा जतन करण्यासाठी 'एन ऊरु' हेरिटेज व्हिलेजचा विस्तार तसेच आदिवासी विद्यापीठ आणि हेरिटेज नॉलेज झोन स्थापन करण्याची योजनाही मांडण्यात आली आहे.

जागतिक पर्यटन नकाशावर केरळची मोहोर

आंतरराष्ट्रीय स्तरावरही केरळच्या पर्यटनाला मोठी मान्यता मिळत आहे. लंडनस्थित 'रफ गाईड्स'च्या अहवालात २०२६ मध्ये भेट देण्यायोग्य जगातील २६ प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये केरळचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळला २०२६ मधील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून गौरविण्यात आले आहे.

प्रसिद्ध जागतिक पर्यटन मार्गदर्शक 'लोन्ली प्लॅनेट'ने आपल्या '२५ बेस्ट एक्स्पिरियन्सेस इन २०२६' या यादीत केरळच्या खाद्यसंस्कृतीचा समावेश केला आहे. जगातील २५ सर्वोत्तम पर्यटन अनुभवांमध्ये स्थान मिळविणारे केरळ हे भारतातील एकमेव राज्य ठरले आहे.

महाराष्ट्रातून केरळला उत्तम कनेक्टिव्हिटी

महाराष्ट्र आणि केरळदरम्यान रेल्वे तसेच विमानसेवेची चांगली कनेक्टिव्हिटी असल्याने महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी केरळचा प्रवास अधिक सोयीचा ठरत आहे. कोची, तिरुवनंतपुरम, कोझिकोड आणि कन्नूर येथील प्रमुख विमानतळांवर बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीमार्गे वन-स्टॉप विमानसेवा उपलब्ध आहेत. रेल्वेनेही केरळला पोहोचण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.दरम्यान, अहमदाबाद, वडोदरा, मुंबई, पुणे, दिल्ली आणि जयपूर येथे आयोजित पर्यटन भागीदारांच्या बैठकांना मिळालेल्या प्रतिसादानंतर आता केरळ टुरिझमकडून ट्रॅव्हल ट्रेड फेअर्स, बीटूबी रोड शो आणि विविध नेटवर्किंग उपक्रम राबविण्यात येणार आहेत. टीव्ही, सोशल मीडिया, प्रिंट आणि रेडिओच्या माध्यमातूनही व्यापक प्रचार केला जात आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या आणि हिवाळी सुट्ट्यांच्या काळात महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी केरळ पर्यटनाचे आकर्षण अधिक वाढण्याची अपेक्षा आहे.