कोल्हापुर,
kolhapur-underwater-droneपाण्यात बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता थेट पाण्यात उतरून जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. कारण कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात आता अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन दाखल झालाय. विशेष म्हणजे, राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा ड्रोन खरेदी करणारे कोल्हापूर हे पहिले जिल्हाधिकारी कार्यालय ठरले आहे.
रिमोट कंट्रोलद्वारे चालणारा हे ड्रोन तब्बल १०० मीटर खोल पाण्यात जाऊन शोध घेऊ शकते. गढूळ पाण्यातही स्पष्टपणे शोध घेता यावा, यासाठी यावर प्रखर क्षमतेचे लाईट्स बसवण्यात आले आहेत. सलग एक तास काम करण्याची क्षमता, सुरक्षित दोरीच्या सहाय्याने नियंत्रण आणि पाण्याखालील वस्तूंची पाहणी करण्याची सुविधा ही या ड्रोनची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी शंभरहून अधिक जणांचा बुडून मृत्यू होतो... अशा दुर्घटनांमध्ये बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हा ड्रोन अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नदी, धरण, तलाव किंवा खोल पाणवठ्यांमध्ये शोधकार्य करताना बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो... गढूळ पाणी, कमी दृश्यमानता आणि पाण्याची खोली यामुळे शोधकार्यात विलंब होतो. आता अंडरवॉटर ड्रोनमुळे पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तूंची पाहणी करणं शक्य होणार आहे. त्यामुळे शोधकार्यातील वेळ वाचण्यासोबतच बचाव पथकाच्या जवानांची जोखीमही कमी होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध आणि बचावकार्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी म्हटले.