मित्राच्या पत्नीनेच दिली वर्षाच्या हत्येची सुपारी

गोंदियातील बोंडरानी हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करत रचला कट, चौघांना अटक
 

गोंदिया,
bondrani-murder-case-in-gondia तिरोडा तालुक्यातील बोंडरानी जंगलात पुणे येथील एअर इंडीयाची कर्मचारी वर्षा धुरनलाल तुरकर (३५) रा. धनोरी/पुणे या महिलेचा तीन आरोपींनी चाकू भोसकून खून केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने उलगडा केला असून घटनेच्या दिवशी वर्षाच्या सोबत असलेला मित्र नितेश अग्रवाल याच्या पत्नीनेच नितेश व वर्षाच्या प्रेमसंबधाला कंटाळून तिच्या खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेतून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केला. पथकाने तांत्रिक तपास आणि तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधार पत्नीसह चौघांना अटक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
bondrani-murder-case-in-gondia
 
पुणे येथे वास्तव्यास असलेली वर्षा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माहेरी खैरलांजी जि. बालाघाट येथे आली होती. १४ नोव्हेंबर रोजी ती गोंदिया येथील तिचा मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत कारने तिरोडा येथे गेली असता बोंडरानी येथील शिवमंदिराजवळील जंगलात कार थांबवून गप्पा मारत असताना तीन अज्ञातांनी वर्षाच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी दवनीवाडा पोलिस ठाण्यात १५ नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना तपासाचे आदेश दिले. एलसीबीने ६ विशेष पथके तयार करून बोंडरानीपासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी आणि बालाघाट मार्गावरील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. यात तीन संशयित दुचाकीवरून नितेश अग्रवाल यांच्या कारचा पाठलाग करताना दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी संशयाच्या आधारे इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, इमरानेने सर्व घटनेचा उलगडा केला. दरम्यान, इमरानसह या प्रकरणातील सहभागी आरोपी शाहरुख खान पठाण, कुणाल कुंभलकर आणि सुपारी देणारी मोना नितेश अग्रवाल या चौघांना १९ नोव्हेंबर रोजी अटक केली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील दोन आरोपी नलेन शेख उर्फ नॉयलॉन आणि क्रिश राऊत हे दोघे फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तर सुपारीची १३ लाख रुपयाची रक्कम कुणी दिली याचा शोध सुरू असून याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी व्यक्त केली आहे.
 
जीपीएस ट्रॅक करून घडवला घात
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुर्री येथून इमरान करीम शेख (२६) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नितेश अग्रवाल आणि वर्षा यांच्यातील प्रेमसंबंधामुळे नितेशची पत्नी मोना प्रचंड त्रस्त होती. तिने शेजारी राहणारा कुणाल कुंभलकर याच्या मदतीने वर्षाचा काटा काढण्याचा कट रचला. दरम्यान, कुणालने सराईत गुन्हेगार शाहरुख पठाण याला १३ लाख रुपयांची सुपारी दिली. शाहरुखने इमरान, नलेन ऊर्फ नायलान आणि क्रिश राऊत तिघेही रा. संजयनगर, मुर्री) यांना हत्येची जबाबदारी सोपवली. विशेष म्हणजे, नितेश वापरत असलेली कार त्याची पत्नी मोना हिच्या नावावर होती. मोनाने कारच्या ‘टोयोटा आय-कनेक्ट’ जीपीएसचा आयडी आणि पासवर्ड आरोपींच्या मोबाईलमध्ये टाकून दिला होता. या जीपीएस लोकेशनच्या मदतीने आरोपींनी थेट बोंडरानीचे जंगल गाठले आणि वर्षाचा खून केला.