मुंबई
Maharashtra Drought Relief राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणखी सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांना विविध शासकीय सवलती आणि मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

नव्याने दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांची माहिती देताना बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. पालघर जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा, त्यात विक्रमगडचा समावेश आहे. याशिवाय दिंडोरी आणि रायगडमधील एका तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी अशोकराव माने यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच गडहिंग्लज तालुक्याबाबत आमदार शिवाजी पाटील यांनी केलेली मागणी शासनाने तपासून मान्य केली. या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांचे बावनकुळे यांनी कौतुक केले.
दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१०
राज्यात यापूर्वी ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. नव्याने सहा तालुक्यांची भर पडल्याने आता ही संख्या ३१० झाली आहे. या निर्णयप्रक्रियेत मंत्री हसन मुश्रीफ यांचेही योगदान असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.
दरम्यान, आणखी १३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी शासनाकडे आली आहे. या मागण्यांची सखोल छाननी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या निर्णयाचेही बावनकुळे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.नामांतराची प्रक्रिया पुढील प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करून राबवण्यात येणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.