मुंबई
Madhavi Nimkar छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री माधवी निमकर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या माधवीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क शेणाने घराची जमीन सारवताना दिसत आहे. तिचा हा साधेपणा आणि पारंपरिक काम करण्याची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत तिचे कौतुक केले आहे.

माधवीला कोकणातील संस्कृती आणि तेथील आठवणींबद्दल विशेष जिव्हाळा आहे. ती अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कोकणातील जीवनशैलीशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून गावी असतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या कोकणातील पारंपरिक घराची झलक पाहायला मिळते.
पारंपरिक घरात शेणाने सारवली जमीन
माधवीचे हे घर जुन्या कोकणी वास्तुशैलीचे दर्शन घडवणारे आहे. कौलारू छप्पर, मातीची जमीन आणि लाकडी शिडी असलेला पोटमाळा अशा पारंपरिक रचनेचे हे घर आहे. व्हिडीओमध्ये माधवी सर्वप्रथम जमिनीवरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करताना दिसते. त्यानंतर ती पाटीत शेण घेते आणि त्यात पाणी मिसळून मिश्रण तयार करते. या मिश्रणाच्या साहाय्याने ती घरातील जमिनीचा संपूर्ण भाग स्वतःच्या हाताने सारवते.
विशेष म्हणजे, या पारंपरिक कामादरम्यान माधवीने शॉर्ट जीन्स आणि टी-शर्ट असा साधा पेहराव केला आहे. तिचा हा अनोखा अंदाजही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ग्लॅमरस दुनियेत वावरणारी अभिनेत्री कोणताही संकोच न बाळगता पारंपरिक पद्धतीने घराची स्वच्छता करत असल्याचे पाहून अनेकांनी तिच्या कृतीचे कौतुक केले आहे.
नेटकऱ्यांकडून साधेपणाचे कौतुक
माधवीने हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. अनेक चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिच्याविषयी आपुलकी व्यक्त केली आहे.एका चाहत्याने, आर्थिक सुबत्ता आणि प्रसिद्धी असूनही माधवी शेणाने जमीन सारवण्यासारखे पारंपरिक काम करत आहे, ही बाब आवडल्याचे सांगितले. तसेच तिच्यातील साधेपणा असाच कायम राहावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अन्य एका नेटकऱ्याने माधवीला शेणाने जमीन सारवताना आणि त्यानंतर रांगोळी काढताना पाहून खूप छान वाटल्याची प्रतिक्रिया दिली.
अभिनयासोबत फिटनेस आणि व्यवसायातही सक्रिय
माधवी निमकर केवळ अभिनयामुळेच नव्हे, तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नियमितपणे योगासने आणि व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. अभिनयक्षेत्रासोबतच तिने उद्योजकीय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. हॉटेल व्यवसायातही तिचे स्वतःचे काम सुरू आहे.दरम्यान, कोकणातील पारंपरिक घरात रमलेली आणि स्वतःच्या हाताने शेणाने जमीन सारवणारी माधवी तिच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या कृतीतून चाहत्यांना तिच्या साध्या आणि पारंपरिक जीवनशैलीची झलक पाहायला मिळत आहे.