मोहित खेडीकर
- ‘शो मस्ट गो ऑन’ची काळीज हेलावणारी कहाणी!
- प्रयोगानंतर दिला भावाला अखेरचा निरोप
नागपूर,
Mayur Maske रंगमंचावर पडदा उघडला की कलाकाराला स्वतःचे दुःख, वेदना आणि वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून व्यक्तिरेखेत शिरावे लागते. मात्र, जेव्हा मोठ्या भावाचा गतप्राण देह घरात असतो, तेव्हा रंगमंचावर उभे राहण्यासाठी किती मनोधैर्य लागते, याची कल्पनाही करवत नाही. अशीच काळीज पिळवटून टाकणारी घटना २१ वर्षीय रंगकर्मी मयूर मस्के याच्या आयुष्यात घडली. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर या छोट्याशा गावात राहणारा मयूर नागपूरच्या हेमेंदू रंगभूमीचा कलाकार. यासोबतच रंगसाधना रंगभूमी नावाने वडसा येथे देखील त्याची कंपनी आहे. त्याचा मोठा भाऊ गौरव मस्के (वय २८) याचा पत्नीसमवेत मोटारसायकलने जात असताना अपघात झाला. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या या अपघातात गौरव गंभीर जखमी झाला, तर पत्नीलाही गंभीर मार बसला. दोघांनाही प्रथम स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले. गौरववर शस्त्रक्रियाही करण्यात आली. कुटुंबीयांना त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा होती. मात्र, गौरवची मृत्यूशी झुंज सुरूच होती.

याच काळात मयूरसमोर झाडीपट्टी नाटकाचा प्रयोग सादर करण्याचे आव्हान होते. एका बाजूला रुग्णालयात जीवन-मरणाशी झुंजणारा भाऊ आणि दुसऱ्या बाजूला रंगभूमीला दिलेला शब्द. मनात भावनांचा कल्लोळ सुरू होता. अशातच गोंदियाहून नागपूरला हलवत असताना गौरवची प्राणज्योत मालवली.
‘तू आधी आपले नाटक पूर्ण कर’
मयूरला घरून निरोप आला. वडील सुधाकर मस्के आणि दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ राकेश यांनी त्याला धीर दिला. हे दोघेही स्वतः कलाकार आहेत. त्यामुळे रंगभूमीचे महत्त्व आणि कलाकाराची जबाबदारी त्यांना चांगलीच ठाऊक आहे. ‘तू आधी आपले नाटक पूर्ण कर, रंगभूमीचे काम पार पाड आणि त्यानंतरच घरी ये,’ असा खंबीर संदेश त्यांनी मयूरला दिला. कुटुंबीयांच्या या शब्दांनी बळ मिळवत मयूरने १५ नोव्हेंबर रोजी रंगमंचावर पाऊल ठेवले. बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या जीवनावर आधारित ‘वनगर्जना’त आपली भूमिका यशस्वीपणे साकारली.
कलासाधक मस्के कुटुंब
गौरव हाही उत्तम तबलावादक आणि गायक होता. गावातील कीर्तन आणि भजनांमध्ये तबलावादन करून तो सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत असे. वडील सुधाकर, भाऊ राकेश आणि दोन्ही भावंडांची कलासाधना हे मस्के कुटुंबाचे वैशिष्ट्य. गौरवच्या जाण्याने या कलाप्रेमी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रंगकर्मीच्या समर्पणाची वेदनादायी उंची
एखादा कलाकार रंगभूमीवर किती समर्पित असतो, याचे मयूर हे जिवंत उदाहरण आहे. कलाकारासाठी रंगभूमी ही केवळ उपजीविकेचे साधन किंवा मनोरंजनाचे माध्यम नसते, तर ती त्याची साधना, श्रद्धा आणि जगण्याचा अविभाज्य भाग असते. स्वतःच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही रंगभूमीशी बांधिलकी जपणे, हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. अर्थात, मयूरच्या या निर्णयामागे त्याच्या वडिलांचा आणि भावाचा खंबीर पाठिंबा तितकाच महत्त्वाचा आहे.
समर्पणाचा आदर्श मयूर
‘शो मस्ट गो ऑन’ हे केवळ रंगभूमीचे ब्रीदवाक्य नाही, तर कलेप्रती असलेल्या निष्ठेचा आणि समर्पणाचा मंत्र आहे, हे मयूरने आपल्या कृतीतून दाखवून दिले. दु:खाच्या डोहात आकंठ बुडाला असतानाही रंगभूमीचा पडदा पडू न देणारा मयूर केवळ कलाकार नाही, तर कलेप्रती समर्पणाचा एक आदर्श आहे.'