डोक्यावरील संशयाच्या भूताने सुखी संसाराची राखरांगोळी

पहिली पत्नी माहेरी, दुसऱ्या पत्नीचाही छळ; संशयी वृत्तीने दोन तरुणींच्या स्वप्नांचा चुराडा

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Crime News ज्या युवकाने देशाच्या सीमेचे रक्षण करण्याची शपथ घेतली, त्यानेच घराच्या उंबरठ्याआड पत्नीच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली. ज्या नात्यात विश्वास, प्रेम आणि सुरक्षिततेची अपेक्षा होती, तिथे संशय, बंधने आणि मारहाणीने जागा घेतली. चारित्र्यावरील संशयाच्या भुताने पछाडलेल्या सैन्यातील एका जवानाचे दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पहिल्या पत्नीचा संसार मोडल्यानंतर दुसऱ्या पत्नीच्याही आयुष्याची घडी विस्कटली. दोन उच्चशिक्षित तरुणींच्या स्वप्नांना पतीच्या संशयी वृत्तीने तडे दिल्याची ही कहाणी आहे.
 
 
Nagpur Crime News
नागपुरातील एका उच्चशिक्षित कुटुंबातील संजयची (काल्पनिक नाव) सैन्यदलात निवड झाली. कुटुंबासाठी अभिमानाची बाब असलेल्या संजयच्या आयुष्यात लग्नानंतर मात्र एक वेगळेच वादळ घोंगावू लागले. संजयच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणीशी ठरवले. ती खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करीत होती. नव्या आयुष्याची स्वप्ने उराशी बाळगून तिने संसाराला सुरुवात केली. मात्र, काही दिवसांतच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने संसार टिकवण्यासाठी तिने नोकरी सोडली. मात्र, संशयाचे सावट अधिक गडद झाले. वाद आणि मारहाण होऊ लागली. ज्या संसारासाठी तिने स्वतःच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवल्या, त्याच संसारात तिचा विश्वास आणि आत्मसन्मान दुखावला जात होता. अखेर सहनशीलतेचा बांध फुटला. संशय आणि छळाला कंटाळून ती कायमची माहेरी निघून गेली. पहिल्या संसाराचा असा दुर्दैवी शेवट झाला.
 
 
दुसऱ्या लग्नातही तीच कहाणी!
पहिल्या लग्नानंतरही संजयच्या वागण्यात बदल झाला नाही. पुढील वर्षी त्याने दूरच्या नातेवाइकांपैकी स्विटी (काल्पनिक नाव) हिच्याशी विवाहकेला. तीदेखील उच्चशिक्षित असून एका शासकीय विभागात नोकरी करीत होती. नव्या नात्यात तिला स्थैर्य, सन्मान आणि प्रेम मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही दिवसांतच तिच्याही आयुष्यात संशयाचे सावट पसरले. संजयने तिलाही नोकरी सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांच्या दबावामुळे स्विटीनेही आपल्या नोकरीचा त्याग केला. त्यानंतर पतीसोबत देशाच्या सीमेवरील तैनातीच्या ठिकाणी ती राहू लागली.
 
 
कपड्यांपासून केशरचनेपर्यंत बंधने!
स्विटीने काय कपडे घालावेत, केसांची रचना कशी असावी, कोणाशी बोलावे आणि घराबाहेर कधी पडावे, यावरही संजय नियंत्रण ठेवू लागल्याचा आरोप आहे. दारूच्या आहारी गेलेल्या संजयचा संशयी स्वभाव अधिकच त्रासदायक ठरू लागला. शेजाऱ्यांशी बोलले तरी त्यावरून वाद आणि मारहाण होत असल्याचे स्विटीचे म्हणणे आहे. घराबाहेर जाण्यावरही निर्बंध होते. घराच्या चार भिंतींत राहून तिने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक कृतीचा हिशेब द्यावा लागणे, सतत संशयाच्या नजरेला सामोरे जाणे आणि सामाजिक संपर्कावर बंधने सहन करणे, यामुळे तिची मानसिक घुसमट वाढत गेली.
 
पतीच्या मोबाइलने उघड केले धक्कादायक वास्तव!
या सगळ्या परिस्थितीत एक दिवस स्विटीने संजयचा मोबाइल तपासला. त्यावेळी तिच्यासाठी धक्कादायक ठरलेली माहिती समोर आल्याचा दावा आहे. घराशेजारी राहणाऱ्या दोन मुलांची आई असलेल्या एका विवाहित महिलेशी संजयचे अनैतिक संबंध असल्याचे तिला आढळून आल्याचे सांगितले जाते.
पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या संजयवरच विवाहबाह्य संबंधांचा आरोप समोर आल्याने स्विटीला मोठा धक्का बसला. मात्र, स्वतःच्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण देण्याऐवजी तो तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असल्याचा आरोप आहे.
नऊ महिन्यांचा छळ; अखेर माहेरचा आधार
अनोळखी राज्यात, जवळचे नातेवाईक नसताना आणि नोकरीही गमावलेल्या अवस्थेत स्विटीने जवळपास नऊ महिने हा त्रास सहन केल्याचे सांगितले जाते. संसार वाचवण्याचा प्रयत्न, परिस्थिती सुधारण्याची आशा आणि नात्याला आणखी एक संधी देण्याची इच्छा यांमुळे तिने बराच काळ मौन बाळगले. मात्र, छळाची तीव्रता वाढत गेल्याने अखेर तिने माहेरचा रस्ता धरला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली. त्यामुळे संजयचा दुसरा संसारही मोडकळीस आला आहे.