नाहिद राणाचे मैदानात पुनरागमन!

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
nahid-rana बांगलादेश क्रिकेट संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा दुखापतीतून सावरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियात उपचार आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे नाहिद राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. त्यानंतर तो उपचारांसाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुनर्वसन पूर्ण केले. वैद्यकीय तपासणीनंतर तो बांगलादेशात परतला असून आता पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे.
 
nahid-rana
 
क्रिकबझच्या वृत्तानुसार, १९ नोव्हेंबर रोजी राणाने बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आणि वैद्यकीय पथकाला आपल्या तंदुरुस्तीची माहिती दिली. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे त्याला एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. बोर्डाच्या सूत्रांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तो उपलब्ध असल्याचे संकेत दिले आहेत. मागील काही महिन्यांपासून राणा सातत्याने दुखापतींचा सामना करत आहे. जुलैमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला ग्रेड-२ साईड स्ट्रेनची दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा, आशियाई खेळ आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात तो सहभागी होऊ शकला नव्हता. पुनर्वसन सुरू असतानाच त्याला नितंबाच्या स्नायूंची दुखापत झाली. यामुळे यूएईमध्ये झालेल्या अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या त्रिकोणी मालिकेतूनही त्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेलाही तो मुकला.
 
दरम्यान, बांगलादेशचे मुख्य निवडकर्ता हबीबुल बशर यांनी यापूर्वीच राणाच्या पुनरागमनाबाबत घाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर बांगलादेशचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत राणा संघात परतल्यास बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीला बळ मिळण्याची शक्यता आहे.