शासकीय धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ

बाक्टी, बोंडगाव देवीत धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
paddy-procurement-centresशेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून वर्षभर शेतात काबाडकष्ट करून तो धानाचे उत्पादन घेत असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाला योग्य दर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना आपले धान शासनाच्या निर्धारित दराने विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य आर्थिक पिळवणूक टाळण्यास मदत होईल. या केंद्रांचा परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
 

dhan kharedi 
तालुक्यातील बाक्टी व बोंडगाव देवी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ पार पडला. या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ‘अ’ ग्रेड धानाला २,४६१ रुपये प्रती क्विंटल, तर साधारण धानाला २,४४१ रुपये प्रती क्विंटल दर मिळणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या खरेदी केंद्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विजय कापगते, रचना गहाणे, पंढरी लोगडे, जयंत लांजेवार, राधेश्याम झोळे, बोरकर, पतिराम मेश्राम, गहाणे आदी उपस्थित होते.