पुणे,
pmpml-shift-bus-serviceहिंजवडी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शिफ्टनुसार बससेवा सुरू करण्यात येणार आहे. मार्चनंतर या सेवेला सुरुवात करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. त्यासाठी दोन्ही औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांची संख्या, कामाच्या शिफ्टच्या वेळा आणि प्रवासाचे मार्ग यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
हिंजवडी आणि चाकण परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक शिफ्टमध्ये काम चालते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पहाटे, रात्री उशिरा तसेच मध्यरात्रीच्या सुमारास कामावर जावे लागते. मात्र या वेळेत सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना खासगी वाहन किंवा खासगी वाहतूक सेवेवर अवलंबून राहावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळांशी सुसंगत बससेवा उपलब्ध करून देण्याचा
पीएमपीएमएलचा प्रयत्न आहे. पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे म्हणाले, हिंजवडी आणि चाकणमधील कंपन्यांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांची संख्या, शिफ्टच्या वेळा आणि प्रवासमार्गांची माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसार बसमार्ग आणि फेऱ्यांचे नियोजन केले जाईल. ही सेवा मार्चनंतर सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, शिफ्टनुसार बससेवा सुरू झाल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होऊन हिंजवडी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
मार्चपर्यंत ५०० सीएनजी बस
सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात २ हजार ११७ बस आहेत. येत्या मार्चपर्यंत आणखी ५०० सीएनजी बस दाखल करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. या अतिरिक्त बसमुळे महामंडळाची सेवा क्षमता वाढणार असून, औद्योगिक आणि आयटी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची गरज पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. कंपन्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे बसमार्ग, वेळापत्रक आणि फेऱ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.