नवी दिल्ली,
puc-now-mandatory-for-old-vehicles केंद्र सरकारने वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासंदर्भात (पीयूसी) महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार आता सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता समान असणार नाही. वाहनाचा बीएस उत्सर्जन दर्जा, वय तसेच वाहनाचा वापर खासगी की व्यावसायिक आहे, यानुसार प्रमाणपत्राची मुदत निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे काही वाहनांना तीन महिन्यांनी, काहींना सहा महिन्यांनी, तर काही वाहनांना दोन ते तीन वर्षांनी पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागणार आहे.
सरकारच्या नव्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांसाठी प्रदूषण तपासणीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ श्रेणीतील वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्राची वैधता केवळ तीन महिने असेल. तर बीएस-४ श्रेणीतील खासगी आणि व्यावसायिक वाहनांना दर सहा महिन्यांनी प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल.
बीएस-६ वाहनांसाठी मात्र त्यांच्या वयानुसार वेगवेगळी मुदत निश्चित करण्यात आली आहे. नोंदणीपासून सहा वर्षांपर्यंतच्या खासगी वाहनांना तीन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र मिळेल. सहा ते दहा वर्षे वय असलेल्या वाहनांना दरवर्षी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल. तर दहा वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेल्या बीएस-६ खासगी वाहनांची दर सहा महिन्यांनी प्रदूषण चाचणी करावी लागणार आहे.
व्यावसायिक बीएस-६ वाहनांसाठीही स्वतंत्र नियम लागू करण्यात आले आहेत. सहा वर्षांपर्यंतच्या वाहनांना दोन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाईल. सहा ते दहा वर्षे वयाच्या वाहनांना दरवर्षी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल. तर दहा वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांना दर सहा महिन्यांनी प्रदूषण तपासणी करणे आवश्यक असेल.
दरम्यान, जुन्या नियमांनुसार जारी करण्यात आलेल्या पीयूसी प्रमाणपत्रांबाबतही सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. नवीन वैधता कालावधी संबंधित वाहनाच्या प्रमाणपत्राचे पहिल्यांदा नूतनीकरण केल्यानंतर लागू होईल. प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या दहा दिवस आधी नूतनीकरण केल्यास नवीन प्रमाणपत्राची वैधता जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या तारखेपासून सुरू होईल. मात्र, मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केल्यास नवीन प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या दिवसापासून वैध मानले जाईल.