अभिनेता सैफ अली खान यांनाही धमकी

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
मुंबई
Saif Ali Khan
चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धमकावण्याच्या घटनांमध्ये आता अभिनेता सैफ अली खान यांचेही नाव समोर आले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील वाँटेड आरोपी जिशान अख्तर याने सैफ अली खान यांना धमकी दिल्याचा दावा पोलिस सूत्रांकडून करण्यात आला आहे. मात्र, या धमकीमागील नेमके कारण आणि त्यामागील व्यक्ती कोण, याचा मुंबई पोलीस सध्या तपास करत आहेत.



यापूर्वी अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अन्य काही कलाकारांनाही धमक्या मिळाल्या होत्या. या प्रकरणांच्या तपासादरम्यान पोलिसांनी बंगळुरू येथील ३० वर्षीय वैभव मिश्रा याला अटक केली होती. वैभव हा आयआयटीचा पदवीधर असल्याची माहिती समोर आली होती.

तपासात वैभवचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले होते. तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून चित्रपट कलाकारांना धमकी देत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सैफ अली खान यांना मिळालेल्या ताज्या धमकीच्या प्रकरणातही पोलीस याच शक्यतेचा विचार करून तपास करत आहेत.या धमकीमागे प्रत्यक्षात जिशान अख्तरच आहे की, एखादी व्यक्ती एआय किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांची आणि चित्रपट कलाकारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे. त्यामुळे सैफ अली खान यांना मिळालेल्या धमकीमागील सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.