बुलढाणा,
shaina-nc-balasaheb-thackeray-rowसोनिया गांधी यांच्या पुस्तकातील एका पानावरून सुरू झालेल्या राजकीय वादात पत्रकार परिषदेदरम्यान शायना एन.सी. यांच्याकडून शिवसेनाप्रमुख श्रद्धेय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याचा आरोप करण्यात येत असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या कृतीचा बुलढाणा जिल्हा शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या वतीने दि. १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे हे एक प्रभावी राजकीय नेते लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे प्रतीक होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या छायाचित्राचा अवमान करणे ही बाब अत्यंत निषेधार्ह असून कोणत्याही राजकीय वादाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका महिला आघाडीने मांडली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन शायना एन.सी. यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी अनिता जाधव, भावना पाटील, पुजा शिंगणे, सविता राऊत, रोशनी गरड, भारती भारंबे, वैशाली मिसाळ, शारदा दाभाडे, स्वाती लोंढेकर, सुनिता दराखे, सुरेखा कदम, बेबी परिहार, निता चव्हाण, यशोदा देशमुख, रुपाली चव्हाण, भारती डागोर, सरला मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.