बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षकाला अटक

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
teacher arrested नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात सायबर पोलिसांनी कान्होलीबारा येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ज्ञानेश्‍वर शिवराम जाधव (वय ३२) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो कान्होलीबारा येथील श्रीमती चित्रलेखादेवी प्राथमिक शाळेतील शिक्षक आहे.
 

बनावट शालार्थ  
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक नेमले आहे. एसआयटीने आतापर्यंत अनेक शिक्षकांची सुनावणी आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा तपास थंडबस्त्यात होता. गेल्या वर्षी तत्कालिन उपसंचालक उल्हास नरड यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीच्या आधारे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातून जवळपास ६२२ शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर उपसंचालक उल्हास नरड याच्यांसह नीलेश वाघमारे, चिंतामण वंजारी, सतीश मेंढे, अनिल पारधी, शिक्षणाधिकारी काळुसे, रोहिणी कुंभार, रवींद्र काटोलकर यांच्यासह लिपिक अशा ४५ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती बघून शहर पोलिसांनी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. याशिवाय राज्य स्तरावरही विशेष तपास पथक नेमण्यात आले. मात्र, त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात गेले होते. तसेच यातील अनेकांना जामिन मिळून त्यांना परत नोकरीवरही शिक्षण विभागाकडून घेण्यात आले. मात्र, आता पुन्हा जाधव याच्या अटकेने पुन्हा तपासाला वेग आल्याने शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
२०२५ पर्यंत पगाराची उचल
आरोपी शिक्षक ज्ञानेश्‍वर जावध याने शाळेत रुजू झाल्यावर त्याने उपसंचालक कार्यालयाकडे शालार्थ आयडीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत प्रस्ताव सादर केला. त्यानंतर या प्रस्तावाच्या आधारे त्याचे शालार्थ आयडी तयार करण्यात आली. त्यावरून त्याने २०२५ पर्यंत पगाराची उचल केल्याचीही माहिती आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात ६२२ शिक्षकांची नावे समोर आली आहेत. यातील ४५ शिक्षकांवर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.teacher arrested त्यानंतर आता अद्यापही ५७६ शिक्षकांच्या आयडी तपासण्यात आलेल्या नसल्याने येत्या काळात या सर्व शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार राहणार आहे.