सिंदेवाही,
tiger-critically-injured-after-being-hit-by-a-car रस्ता ओलांडत असलेल्या एका वाघाला कारची जोरदार धडक बसली. या अपघातात वाघ गंभीर जखमी झाला असून, त्याच्या कमरेखालील भागाला मोठा मार लागल्याची माहिती आहे. ही घटना गुरुवारी, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास सिंदेवाही-पळसगाव मार्गावरील खातगाव फाट्याजवळ घडली.
कार नागपूरहून बल्लारपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. वाघ जखमी अवस्थेत रस्यावर असल्याची माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने वाघाला डार्ट मारून बेशुध्द केले. त्यानंतर त्यास जेरबंद करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना करण्यात आले. या प्रकरणी कारचालक व कारमालक यांना ताब्यात घेण्यात आले असून, वनविभाग व पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सिंदेवाही तालुका घनदाट जंगलाने वेढला असल्याने या परिसरातील महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर वाघ, बिबट्या तसेच इतर वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. विशेषतः रात्रीच्या वेळी वन्यप्राणी रस्ता ओलांडताना दिसून येतात. अशा परिस्थितीत वाहनचालकांकडून वेगावर नियंत्रण न ठेवल्यास वन्यजीवांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मार्गावर वाहनांसाठी वेगमर्यादा, आवश्यक सूचना फलक आणि रात्रीच्या वेळी विशेष गस्त यांसारख्या उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.