वाशीम,
clean-washim शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या सफाई कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि त्यांना आधुनिक घनकचरा व्यवस्थापनाची माहिती देण्याच्या उद्देशाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वाशीम नगर परिषदेत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कचरा वर्गीकरण, संकलन, विल्हेवाट आणि सुरक्षित कार्यपद्धतींबाबत कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला वाशीम नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता गजानन हिरेमठ, जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ सानप, आरोग्य निरीक्षक जितू बढेल, माधव सूक्ते, सुरज संगत तसेच शहर समन्वयक श्याम भुसेवार उपस्थित होते. कार्यशाळेत कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनचे प्रशिक्षक शुभम चातुरकर यांनी सफाई कर्मचार्यांना घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. यामध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, कचर्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू न देणे, कचर्याची सुरक्षित वाहतूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छतेची कामे करताना कर्मचार्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी वैयक्तिक सुरक्षा साधनांचा योग्य वापर, कामाच्या ठिकाणी घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षित कार्यपद्धतींचे पालन याबाबत विशेष माहिती देण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी, सफाई कर्मचार्यांच्या दैनंदिन कामकाजातील जबाबदार्या आणि शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्यांचे योगदान यावरही प्रकाश टाकण्यात आला.
शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचाही त्यामध्ये तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे. प्रत्येक नागरिकाने घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे कर्मचार्यांची कार्यक्षमता व आत्मविश्वास वाढण्यासोबतच शहरातील स्वच्छता व्यवस्थाही अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.