मध्यरात्री मृत्यूचा तांडव! पाच जणांचा जागीच मृत्यू

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
up road accident
उत्तर प्रदेशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांमुळे खळबळ उडाली आहे. बलरामपूर जिल्ह्यात १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी लखनऊ येथे हलविण्यात आले आहे. दुसरीकडे, बाराबंकी येथे भरधाव कारने पुढे जाणाऱ्या डीसीएम वाहनाला मागून धडक दिल्यानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने, कारमधील पाचही प्रवाशांनी वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला.



बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला कोतवाली क्षेत्रातील अक्सीबडहरा गावाजवळ बलरामपूर-उतरौला मार्गावर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर काही पादचारीही या अपघाताच्या विळख्यात सापडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी लखनऊ येथील उच्चस्तरीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

घटनास्थळाची पाहणी आणि प्राथमिक तपासादरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेल्या दोन दुचाकी, तुटलेली दोन हेल्मेट आणि एका मृत शेळीचे अवशेष आढळून आले. या अपघाताची माहिती मिळताच बलरामपूरचे पोलिस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असून, मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.


पोलिस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, उतरौला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अक्षी बलहारा गावाजवळ रात्री सुमारे ११ वाजता ही दुर्घटना घडली. समोरासमोर येणाऱ्या दोन दुचाकींची धडक झाली असावी. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या पादचाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. त्यातच परिसरातील धुक्याचाही परिणाम झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. मृतांची ओळख पटली असून, ते बलहारा खुर्द, छपरतलवा आणि चंदापूर श्रीदत्तगंज येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बाराबंकी जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री आणखी एक भीषण अपघात घडला. सफदरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अयोध्येहून लखनऊच्या दिशेने जाणारी भरधाव कार पुढे चाललेल्या डीसीएम वाहनावर मागून आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या धडकेनंतर काही वेळातच कारने पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, कारमधील पाचही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उड्या घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. उत्तर प्रदेशातील या दोन घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.