सुनेत्रा-पार्थ पवारांना वगळून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
ncp विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालानंतर पक्षातील राजकीय वातावरण तापले असून, खुद्द राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीतील अपयशाचे आत्मपरीक्षण करण्याची गरजही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत असतानाच आता पक्षातील काही बड्या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.
 

ajit pawar 
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार उपस्थित नव्हते. या दोघांना वगळून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
एकीकडे निवडणुकीतील ncp पराभवानंतर पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे, तर दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी झालेली भेट अनेक राजकीय तर्कवितर्कांना जन्म देत आहे. या भेटीमागे नेमके कोणते राजकीय समीकरण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी भेटीच्या छायाचित्रामुळे चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या भेटीचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होणार की या भेटीतून राज्याच्या राजकारणात एखाद्या नव्या समीकरणाची पायाभरणी होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसेच राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.