बारामतीत पावसाचं थैमान! एका रात्रीत 158 मिमी पाऊस...

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |

बारामती,
baramati-heavy-rain-158mmपुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला आहे. संपूर्ण महिनाभराचा पाऊस एका रात्री कोसळला आहे. अचानक पाऊसाने हजेरी लावल्याने बारामतीतील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पहाटेपासून अनेक ठिकाणी लाईट गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. एका रात्रीत एवढ्या मोाठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नागरिकांनी काही काळासाठी घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावं असं आव्हान बारामती नगर पालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केलं आहे.

baramati 
 
 
बारामतीत एका रात्रीत महिनाभराचा पाऊस पडला असून सकाळी सात वाजेपर्यंत 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बारामती शहरातील मुख्य रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं. काही बसची चाकं बुडतील इतकं पाणी साचलं.
 
या पावसाची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. पाणी साचून अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करत आहेत. पोलीस प्रशासनही नागरिकांना मदत करत आहे. नागरिकांनी पावसाचा जोर कमी होईपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नये आणि बाहेर पडावं लागल्यास योग्य काळजी घ्यावी, असं आवाहन नगराध्यक्षांनी केलं आहे.