चेन्नईचा १४.२० कोटींचा डाव फसला? दोन खेळाडूंवर टांगती तलवार!

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Chennai's ₹14.20 crore gamble backfired आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी संघबांधणीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, चेन्नई सुपर किंग्समध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. मागील लिलावात मोठी रक्कम खर्च करून संघात घेतलेल्या दोन युवा खेळाडूंपैकी एकाला किंवा दोघांनाही संघातून मुक्त केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांना चेन्नईने प्रत्येकी १४.२० कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. मात्र, अपेक्षेनुसार कामगिरी न झाल्याने त्यांच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या खेळाडूंना रिलीज केल्यास चेन्नईच्या लिलावासाठी उपलब्ध असलेल्या रकमेचा साठा वाढू शकतो.
 
 
 
prasahant
 
उत्तर प्रदेशातील अमेठीचा प्रशांत वीर याच्यासाठी २०२६ च्या आयपीएल लिलावात मोठी चढाओढ पाहायला मिळाली होती. त्याची मूळ किंमत अवघी ३० लाख रुपये असताना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांनी सुरुवातीला बोली लावली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनीही स्पर्धेत प्रवेश केला. हैदराबादने १४ कोटी रुपयांची अंतिम बोली लावल्यानंतर चेन्नईने १४.२० कोटी रुपये मोजून प्रशांतला आपल्या संघात घेतले. मात्र, संपूर्ण हंगामात त्याला सहा सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याने ९० धावा केल्या, तर त्याला एकही बळी मिळवता आला नाही. दुसरीकडे, कार्तिक शर्मासाठीही लिलावात मोठी स्पर्धा झाली होती. त्याचीही मूळ किंमत ३० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी बोली लावली. हैदराबादने १४ कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर चेन्नईने १४.२० कोटी रुपये देत त्याला संघात घेतले. कार्तिकने मागील हंगामात ११ सामन्यांत २९५ धावा केल्या. मात्र, त्याच्यासाठी खर्च केलेल्या रकमेच्या तुलनेत ही कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे मानले जात आहे.
 
 
चेन्नई सुपर किंग्सने या दोन खेळाडूंवर मिळून २८.४० कोटी रुपये खर्च केले होते. सध्या संघाच्या खात्यात लिलावासाठी केवळ २.४ कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती आहे. आगामी हंगामापूर्वी लिलावासाठी उपलब्ध असलेल्या रकमेत पाच कोटी रुपयांची वाढ झाली, तरी चेन्नईकडे एकूण सुमारे ७.४ कोटी रुपयेच उपलब्ध होतील. त्यामुळे मोठ्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघासमोर आर्थिक मर्यादा असू शकतात. क्रिकबझच्या वृत्तानुसार, प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यापैकी किमान एका खेळाडूला रिलीज करून लिलावातील आर्थिक क्षमता वाढवण्याचा चेन्नईचा विचार आहे. गरज पडल्यास संबंधित खेळाडूला लिलावात पुन्हा कमी किमतीत घेण्याची रणनीतीही आखली जाऊ शकते. दरम्यान, आयपीएल २०२७ साठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी होणार असून, सर्व दहा संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत आपली रिटेन्शन यादी जाहीर करायची आहे. त्यामुळे चेन्नईसह अन्य संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवतात आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.