नारायणतळा,
Clashes at church inauguration in Bengal नारायणतळा येथे शनिवारी हा प्रकार घडला. बिशप सुब्रत चक्रवर्ती यांच्यासह अनेक पाद्री आणि मोठ्या संख्येने श्रद्धाळू नवीन चर्चच्या उद्घाटनासाठी जमले होते. याचवेळी ३० ते ३५ जणांचा जमाव अचानक चर्चच्या परिसरात घुसला आणि उपस्थितांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत पाद्री आणि श्रद्धाळूंना मारहाण करण्यात आली, तसेच महिलांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे. महिलांच्या हातातील पारंपरिक पांढऱ्या शंखाच्या बांगड्या म्हणजेच 'शाखा' जबरदस्तीने काढण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हल्लेखोरांनी चर्चमधील पवित्र क्रॉसची तोडफोड केल्याचा आरोप असून, घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांचे फोन हिसकावून फोडण्यात आल्याचेही समोर आले आहे. याशिवाय चर्चच्या परिसरात भविष्यात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशी धमकी उपस्थितांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी पोलिसांनी या घटनेला दुजोरा देत तक्रार प्राप्त झाल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ख्रिश्चन समुदायातील संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 'बंगिया ख्रिस्तिया परिसेवा' (बीसीपी) या संघटनेने हल्ल्याचा निषेध केला आहे. संघटनेचे संस्थापक राज्य सचिव आणि कार्यकारी अध्यक्ष हेरोड मल्लिक यांनी या घटनेला अल्पसंख्याक समुदायाला घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. बिशप उपस्थित असताना अनेक पाद्र्यांना मारहाण होणे ही अत्यंत निंदनीय बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातही तीन ख्रिश्चन कुटुंबांनी अशाच प्रकारची तक्रार पोलिसांकडे केली होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या या कुटुंबांना धर्म सोडण्यासाठी धमकावण्यात आल्याचा आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध विशिष्ट धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता.