औरैया,
Controversy over Maulana Jirjis's statement उत्तर प्रदेशातील औरैया येथे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. योगी सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी फिलिस्तीनचा संदर्भ देत उत्तर प्रदेशचीही तशी परिस्थिती होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. मुस्लिम समाजाने आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘आपण विखुरलेले आहोत, आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये. योगी सरकार पुन्हा आले, तर उत्तर प्रदेशात मुस्लिमांची घरे जाळली जातील आणि त्यांच्यावर बुलडोझर चालवले जातील,’ असे वक्तव्य मौलाना यांनी केले.

आपल्या आधीच्या विधानांवरून कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र त्याच काळात सीजेपीचे जंतरमंतरवरील आंदोलन सुरू झाल्याने आपल्यासंदर्भातील प्रकरण मागे पडल्याचा दावा मौलाना जर्जिस यांनी केला. सीजेपीचे आंदोलन आपल्यासाठी दिलासादायक ठरल्याचे सांगताना, त्या आंदोलनामुळे आपली बातमी मागे पडली आणि प्रकरण संपल्याचेही ते म्हणाले. पश्चिम बंगालचा संदर्भ देत त्यांनी मुस्लिम समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले. मुस्लिमांच्या चुकीमुळे बंगाल हातातून गेल्याचा दावा करत, उत्तर प्रदेशात अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, असे त्यांनी म्हटले. यापूर्वीही मौलाना जर्जिस यांनी भगवान राम आणि कृष्ण यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. तसेच मुस्लिमांनी बंगालमध्ये स्थलांतर करावे, असे विधानही त्यांनी यापूर्वी केले होते.
दरम्यान, मौलाना जर्जिस यांच्या ताज्या विधानावर अयोध्येतील महंत विष्णुदास यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मौलाना मुस्लिम समाजाला भडकवण्याचे काम करत असून, त्यांची विधाने देशविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. जर्जिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय अनेक संघटनांनी त्यांच्या विधानांचा निषेध केला आहे. वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.