नवी दिल्ली,
Court expresses displeasure over Nora's absence कथित खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित खटल्यात अभिनेत्री नोरा फतेही न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने नोरा फतेही यांच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करत त्यांना ६ नोव्हेंबर रोजी साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणात नोरा यांची अभियोजन पक्षाच्या साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवली जाणार आहे. मात्र, निर्धारित तारखेला त्या न्यायालयात उपस्थित न राहिल्याने त्यांच्या वकिलांनी हजेरीतून सूट देण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत न्यायालयीन प्रक्रियेला हलक्यात घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.

नोरा फतेही यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान सांगितले. २२ ऑक्टोबर रोजीच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यासाठी ई-मेल आणि व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात आला होता. तसेच दूरध्वनीवरूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र नोरा फतेही यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला कळवले. त्या सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत की नाही, याबाबतही पोलिसांकडे कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला.
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रात नोरा फतेही यांना सरकारी साक्षीदार करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना पुढील तारखेला उपस्थित राहून अभियोजन पक्षाच्या वतीने साक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांना न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, त्या अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने पुन्हा समन्स बजावले असून, ६ नोव्हेंबर रोजी त्यांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे.