तेहरान,
Decline in crude oil prices मध्यपूर्वेतील संघर्षावर तोडगा निघण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर तीन टक्क्यांहून अधिक खाली आले असून, डब्ल्यूटीआय क्रूडचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर १९ नोव्हेंबरच्या डिलिव्हरीसाठी असलेल्या कच्च्या तेलाच्या व्यवहारात ३.५३ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे त्याचा भाव प्रति बॅरल ९,५८६ रुपयांवर आला. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक आणि कमोडिटी बाजारातील तज्ज्ञ अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांतील उच्चांकी पातळीवरून कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत. मध्यपूर्वेतील संघर्ष थांबवण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. त्याचवेळी अमेरिकेकडून इराणवर पुन्हा लष्करी कारवाई होण्याची शक्यताही बाजारात विचारात घेतली जात आहे.
दरम्यान, कतार आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी चर्चा सुरू होती. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणसंदर्भातील अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी संभाव्य कराराचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अजय केडिया यांनी सांगितले. दुसरीकडे, नव्याने हल्ला झाल्यास शेजारील देशांमधील अमेरिकन आणि इस्रायली तळांवर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकांपूर्वी इराणवर कोणताही नवीन हल्ला केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय, तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक प्लसनेही आठवड्याच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत सध्याचे उत्पादन लक्ष्य कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. या सर्व घडामोडींमुळे तेल बाजारातील समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांबाबत ऑइलप्राइस डॉट कॉमने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी भारतीय वेळेनुसार सकाळी सुमारे १०.३० वाजता डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ३.१८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल १००.८१ डॉलरवर व्यवहार करत होता. तर ब्रेंट क्रूडच्या किमतीत ३.०१ टक्क्यांची घट होऊन तो प्रति बॅरल ११०.०२ डॉलरवर आला होता. दुसरीकडे, मुर्बन क्रूडच्या दरात कोणताही बदल झाला नसून तो प्रति बॅरल ११४.८१ डॉलरवर स्थिर होता. मध्यपूर्वेतील राजनैतिक हालचाली आणि संभाव्य लष्करी संघर्षाबाबतच्या संकेतांवर आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतींची दिशा अवलंबून राहणार आहे.