अमित साटम यांचा दिया मिर्झाला आक्षेप

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
amit satam मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत क्रिकेटपटूंसह सिनेविश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. मात्र, या सेलिब्रिटी मोहिमेवरून आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या व्हिडीओवर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे.
 

dia mirza’s diwali awareness video deleted by bmc after amit satam objection; actress reacts 
दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, फटाक्यांचा वापर कमी करावा आणि प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असा संदेश मुंबई महानगरपालिकेच्या जनजागृती मोहिमेतून दिला जात आहे. यासाठी पालिकेने अनेक क्रिकेटपटू आणि कलाकारांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अभिनेत्री दिया मिर्झाचाही यामध्ये समावेश होता. मात्र, तिच्या व्हिडीओवरून अमित साटम यांनी नाराजी व्यक्त केली.
अमित साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. “आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या आक्षेपामुळे महापालिकेच्या सेलिब्रिटी जनजागृती मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुंबई amit satam  महानगरपालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आल्याचे दिसून आले. या मोहिमेत माधुरी दीक्षित, महेश कोठारे, शिव ठाकरे आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांचे व्हिडीओही समाविष्ट होते. मात्र, उपलब्ध माहितीनुसार दिया मिर्झाचाच व्हिडीओ हटवण्यात आला आहे. तो नेमका कोणत्या कारणामुळे हटवण्यात आला, याबाबत महापालिकेकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतरच हा व्हिडीओ हटवण्यात आल्याची चर्चा आहे.
 
 

दिया मिर्झाची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
व्हिडीओ हटवल्यानंतर दिया मिर्झानेही सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. या मोहिमेसाठी आपण कोणतेही मानधन किंवा पैसे घेतले नसल्याचे तिने स्पष्ट केले. “कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही,” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली. तिच्या या टिप्पणीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
एकीकडे पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महापालिकेची मोहीम, तर दुसरीकडे दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून उपस्थित झालेला आक्षेप, यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र, व्हिडीओ हटवण्यामागचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.