नवी दिल्ली,
Even breathing is difficult in Delhi देशाची राजधानी दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले असतानाच देशातील १८ राज्यांमध्ये पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हवामान बदलाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) २ नोव्हेंबरसाठी हा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही भागांमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मैदानी भागांत वादळी वारे आणि पावसाच्या काळात काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छीमारांना खराब हवामानात समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये २ नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून, वारे ताशी ३० किलोमीटर वेगाने वाहू शकतात. येथे कमाल तापमान २९ आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय ४२८ वर पोहोचला. त्यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली. सकाळपासूनच शहरातील अनेक भागांमध्ये धुरक्याचे दाट आवरण पसरल्याने दृश्यमानतेवर परिणाम झाला. धुक्यामुळे राष्ट्रपती भवन परिसरही अस्पष्ट दिसत होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, इंडिया गेट आणि जनपथ परिसरात एक्यूआय ३३५, अक्षरधाम मंदिराजवळ ३४९, तर आयटीओ परिसरातही ३४९ इतका नोंदवण्यात आला. हे सर्व आकडे अत्यंत खराब हवा गुणवत्ता श्रेणीत मोडतात. दुसरीकडे, मुंबईतील काही भागांमध्येही धुरक्याचे आवरण पाहायला मिळाले. वांद्रे रिक्लेमेशन परिसरात सकाळी धुरक्यामुळे उंच इमारतीही अस्पष्ट दिसत होत्या. मात्र, मुंबईचा एक्यूआय १३१ नोंदवण्यात आला असून, तो मध्यम श्रेणीत आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील इटावा, गौतमबुद्ध नगर, मेरठ, हरदोई, उन्नाव, देवरिया, आझमगड, रायबरेली, अयोध्या आणि आग्रा यांसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लखनऊमध्ये कमाल २९ आणि किमान २० अंश तापमान राहण्याची शक्यता आहे. बिहारमधील बेगुसराय, किशनगंज, पूर्णिया, वैशाली, भोजपूर, दरभंगा, मधुबनी आणि सहरसा येथेही जोरदार पावसाचा अंदाज असून, पाटण्यात कमाल तापमान ३० आणि किमान २२ अंश सेल्सिअस राहू शकते.
राजस्थान आणि मध्य प्रदेशातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमधील बूंदी, सीकर, जैसलमेर, भरतपूर, बिकानेर, झुंझुनू, टोंक, धौलपूर आणि चुरू या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जयपूरमध्ये कमाल तापमान ३० आणि किमान १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन, देवास, इंदूर, दमोह, बैतूल, छिंदवाडा, रायसेन, खंडवा, खरगोन, सिंगरौली, छतरपूर आणि कटनी येथे वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोपाळमध्ये कमाल २९ आणि किमान १९ अंश तापमान राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, दुर्गापूर, बीरभूम, मुर्शिदाबाद, नादिया, हावडा आणि पुरुलिया येथेही जोरदार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज आहे. कोलकात्यात कमाल तापमान ३२ आणि किमान २५ अंश सेल्सिअस राहू शकते. याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि तेलंगणा यांसह अन्य राज्यांमध्येही हवामान बिघडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.