अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना! ९ जणांचा मृत्यू

कोसळण्यापूर्वी पायलटची शेवटची आर्त हाक, एटीसी रेकॉर्डिंगने अंगावर काटा

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
अमेरिका
florida plane crash अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात रविवारी एक भीषण विमान दुर्घटना घडली. ग्रीनएक्रसमधील निवासी परिसरात लियरजेट ६० हे खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी काही क्षणांत घडलेल्या घटनांचे एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) रेकॉर्डिंग आता समोर आले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये विमानातील प्रवाशांच्या किंकाळ्या, पायलटची मदतीसाठी सुरू असलेली धडपड आणि विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगणारे संवाद ऐकायला मिळत आहेत. अपघाताच्या शेवटच्या क्षणांचे हे संभाषण अंगावर शहारे आणणारे आहे.
 

 florida plane crash  
समोर आलेल्या एटीसी रेकॉर्डिंगनुसार, विमानातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. विमान वेगाने खाली येत असताना प्रवाशांकडून मदतीसाठी आक्रोश केला जात होता. 'आमच्याकडे वेळ नाहीये', असे म्हणत विमानातील लोक मदतीसाठी ओरडत असल्याचे रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येते. विमानातील एका महिला क्रू मेंबरचा आवाजही या संभाषणात ऐकायला मिळतो. 'हे देवा, आमच्याकडे वेळच राहिलेला नाहीये', अशी तिची आर्त हाक ऐकू येते. त्यानंतर काही क्षणांतच विमान जमिनीवर आदळल्याचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये नोंदवला गेला.
 
 
विमान कोसळण्यापूर्वी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला परिस्थितीची माहिती दिली होती. 'आम्ही ८ हजार फूट खाली जात आहोत. मेडे, मेडे... आम्ही १० हजार फूट प्रतिमिनिट वेगाने खाली येत आहोत. विमान ओव्हरस्पीडच्या स्थितीत आहे. आम्ही २० हजार फूट प्रतिमिनिट वेगाने खाली कोसळत आहोत. आम्ही जमिनीवर आदळणार आहोत', असे पायलटने सांगितल्याचे रेकॉर्डिंगमधून समोर आले आहे. दरम्यान, विमानातील एका व्यक्तीनेही विमान सुमारे ६० अंशांनी झुकल्याचे आणि त्यावरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले होते.
 
 
कुठे चालले होते विमान?
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) माहितीनुसार, लियरजेट ६० या विमानाने टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. हे विमान बहामासमधील नॉर्थ एलेउथेरा येथे जात होते. विमान सुमारे ३५ हजार फूट उंचीवरून पूर्व दिशेला प्रवास करत होते. याचदरम्यान पायलटने खराब हवामानाची माहिती दिली होती. विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागत होता. तसेच बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि हिमवर्षावाची परिस्थिती असल्याचेही त्याने कळवले होते. यावेळी पायलटने आणखी २ हजार फूट उंचीवर जाण्याची परवानगी मागितली होती.
विमान जमिनीकडे वेगाने झेपावत असताना एअर ट्रॅफिक कंट्रोलरनेही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 'नोव्हेंबर टू, ब्रावो डेल्टा, मी तुमच्यासोबत आहे. माझ्याशी संवाद साधा', असे सांगत कंट्रोलरने पायलटशी संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.
 
 

प्रति मिनिट ३० हजार फुटांपेक्षाही अधिक वेगाने खाली
समोर आलेल्या फ्लाइट डेटानुसार, विमान सुरुवातीला सुमारे १० हजार फूट प्रतिमिनिट वेगाने खाली आले. त्यानंतर हा वेग वाढून २० हजार फूट प्रतिमिनिट झाला. पुढे विमान ३० हजार फूट प्रतिमिनिटांपेक्षाही अधिक वेगाने जमिनीकडे कोसळू लागले. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते उजव्या बाजूला झुकल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, फ्लाइट डेटाच्या पुढील विश्लेषणातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली. विमान कोसळण्यापूर्वी त्याचा खाली येण्याचा वेग ३२ हजार फूट प्रतिमिनिटांपेक्षाही अधिक झाला होता. विमानाचा शेवटचा सिग्नल जमिनीपासून सुमारे ८ हजार ७५० फूट उंचीवर नोंदवण्यात आला होता.
या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याने अमेरिकेत हळहळ व्यक्त केली जात आहे. विमानातील तांत्रिक बिघाड, खराब हवामान किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान कोसळण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, एटीसी रेकॉर्डिंग आणि फ्लाइट डेटाच्या आधारे अपघाताच्या शेवटच्या क्षणांचा घटनाक्रम समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.