धानोरा,
gadchiroli-poultry-trainingग्रामीण महिलांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन आणि विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त वतीने ‘परसबागेतील कुक्कुटपालन’ विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात 10 गावांतील 58 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कुक्कुट विज्ञान विभागातील डॉ. साईचरण हांडे यांनी सहभागी महिलांना कुक्कुटपालनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, पक्ष्यांची निगा, खाद्य व्यवस्थापन, मूलभूत पशुआरोग्य सेवा, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना कुक्कुटपालनाच्या विविध बाबींचे प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सहभागी सर्व महिला एकल महिला किंवा भूमिहीन कुटुंबांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी परसबागेतील कुक्कुटपालन हा केवळ पूरक व्यवसाय नसून उपजीविकेची सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि संकटांचा सामना करण्याची क्षमता वाढविणारा महत्त्वपूर्ण पर्याय ठरू शकतो.
यावेळी एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी किरण गोरे यांनी महिलांशी संवाद साधत परसबागेतील कुक्कुटपालनाचे महत्त्व, त्यातील आर्थिक संधी आणि ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नवाढीसाठी असलेली क्षमता याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन कुक्कुटपालनाला उत्पन्नाचे साधन म्हणून विकसित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एसटीआरसीचे सीपीओ स्वप्निल गिरडे, गंधर्व सर, विनोद सर, ऋषिकेश डकरे तसेच एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सदुराम मडावी आणि नाजूक भांडेकर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे कौशल्यवर्धन करणे, कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे, पोषण सुरक्षा मजबूत करणे आणि विशेषतः एकल व भूमिहीन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविणे हा संस्थांचा मुख्य उद्देश आहे.